नामदेव पतंगे यांना गोरेगाव पोलिसांकडून ताब्यात घेतल्याचा संघटनेचा आरोप; कारवाईचा निषेध करत जिल्हाभर आंदोलनाचा इशारा
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. गोरेगाव पोलिसांनी सकाळी ८ वाजता ताकतोडा येथून पतंगे यांना ताब्यात घेतल्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात नेऊन नजरकैदेत ठेवल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या कारवाईचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आगामी काळात जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नामदेव पतंगे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा कारवाईला संघटना घाबरणार नाही. पोलिसांकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तरी क्रांतिकारी शेतकरी संघटना शांत बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचे संकेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिले आहेत.