लातूर : शासनाने प्रकाशित केलेले महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर, लातूर जिल्हा, मधील पान क्रमांक १८५ व १८६ वर लातूर जिल्ह्यातील प्रमुख जाती व जमाती यांचा उल्लेख असून या पानावर लातूर जिल्ह्यातील कुणबी जातीचा सविस्तरपणे उल्लेख केलेला आहे. एवढेच नाही तर लातूर जिल्ह्यातील मराठा कुणब्यांची आडनावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. ही आडनावे जाधव, गुंजरगे, सपाटे, कोकाटे, काळे, लोंढे, सुरवसे, पवार, धुमाळ, लखणे, टोणपे, नाईकवाडे, गवारे, गोमणे, मोरे, बिराजदार इत्यादी अशी नमूद आहेत. महाराष्ट्र शासनाने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याचे आश्वासित करूनही कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत.
शासनानेच प्रकाशित केलेल्या लातूर जिल्हा गॅझेटिअरला हैदराबाद गॅझेटिअरचा आधार असून यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आडनावातील सर्व अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश करावेत, असे निवेदन मराठा क्रांती मोर्चा लातूर जिल्ह्याच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी अशोक बास्टेवाड यांना देण्यात आले. याप्रसंगी नोडल ऑफिसर अहिल्या गाठाळ उपस्थित होत्या.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देण्यात आल्या असून लातूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणात हैदराबाद आणि लातूर गॅझेटिअरचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे परिपत्रक मराठा क्रांती मोर्चा लातूर जिल्ह्याच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.