लातूर, धाराशिव व गुलबर्गा जिल्हाधिकाऱ्यांकडे रेल्वे विभागाचे पत्र!
उमरगा : चाळीस वर्षांपासून राजकीय गुलदस्त्यात अडकलेल्या लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्गाच्या हालचालींना राजकीय व प्रशासकीय स्तरावर वेग आला असून सोलापूर रेल्वे विभागातील निर्माणचे उपमुख्य अभियंता कार्यालयाकडून लातूर आणि धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना नुकताच पत्र व्यवहार करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रकल्पाच्या खर्चासाठी राज्य शासनाकडे ५० टक्के सहभाग आणि आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
या १५७.८१७ किमी लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी अंदाजे पाच हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. अंतिम पाहणी सर्वेक्षणानुसार लातूर जिल्ह्यात ६८.८१७ किमी साठी ३०४.५३१ हेक्टर जमीन संपादित करण्याची गरज आहे. धाराशिव जिल्ह्यातील २८ किमी करिता १२३.९०६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा अर्थात कलबुर्गी जिल्ह्यातील ६१ किमी करिता २६९.९३९ हेक्टर जमीन संपादित जमिनीची आवश्यकता भासणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून जमीन अधिगृहीत प्रक्रिया पूर्ण झाल्यास रेल्वे लाईन उभारणीच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे लातूर ते गुलबर्गा या मार्गावरील लातूर, औसा, लामजना, उमरगा, आळंद या नवीन रेल्वे मार्गावरून जाणे-येणे करण्यासाठी प्रवाशांना १५७.८२ किमीचे अंतर पूर्ण करता येणार आहे. कमी अंतराच्या प्रवासामुळे लातूर ते गुलबर्गा या मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना व माल वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना हा रेल्वे मार्ग सोयीचा होणार आहे. मौल्यवान वेळ वाचण्यास मोठी मदत होणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे राष्ट्रीय महामार्ग ६५ वर असलेल्या उमरगा शहराला मुंबई - पुणे ते हैदराबाद दरम्यानचे प्रमुख व्यापारी केंद्र होण्यास मोठी संधी मिळणार आहे. या रेल्वे मार्गामुळे उमरगा - लातूरसह परिसरातील औद्योगिक वसाहतींना मोठा लाभ होणार आहे.
उमरगा, किल्लारी, लामजना, औसा मार्गे लातूर!
औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार : आ. प्रवीण स्वामी
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ५० - ५० टक्के निधीचा वाटा आवश्यक आहे. या प्रकल्पाचा सर्व्हे कलबुर्गी, कडगंची, आळंद, उमरगा, किल्लारी, लामजना, औसा, लातूर असा करण्यात आला आहे. लातूर - औसा - उमरगा या मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्राच्या माल वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा मानण्यात येत आहे. या रेल्वे मार्गामुळे कृषी, विविध व्यापार व उद्योगांना चालना मिळणार आहे. आठ ते दहा दिवसांच्या आत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गाच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याची मागणी करणार आहे. लातूर व धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे दोन्ही खासदार या कामी सकारात्मक आहेत. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कसलेही राजकारण आडवे येणार नाही. या रेल्वे मार्गाचे प्रमुख जंक्शन बिरुदेव मंदिर परिसरात होणार असल्याने उमरगा - लोहारा तालुक्यांना विकासाचा बूस्ट मिळणार आहे.
- आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले.