अंतरवाली सराटीत प्रशासनाचे लक्ष
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम जाणवत असून, त्यांची तपासणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी वैद्यकीय पथक अंतरवाली सराटीत दाखल झाले. मात्र, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला. काही वेळानंतर पुन्हा तपासणी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकुडे यांनी दिली.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची नियमितपणे पाहणी केली जात आहे. उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांच्या आरोग्याबाबत समर्थकांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, यासाठी डॉक्टरांकडून त्यांना वारंवार विनंती केली जात आहे.
Jalna, Maharashtra: Maratha reservation activist Manoj Jarange Patil refused to undergo a medical examination, on the fourth day of his indefinite hunger strike.
— IANS (@ians_india) September 1, 2026
A medical team that arrived to check his health was sent back. His condition has reportedly been deteriorating since… pic.twitter.com/05vELr5f7M
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती घेतली.
या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाचा प्रतिसाद मिळत असून अंतरवाली सराटीत समर्थकांची गर्दी वाढत आहे. सरकारने तातडीने चर्चा करून मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
उपोषणाला चार दिवस पूर्ण झाले असतानाही सरकारचे अधिकृत शिष्टमंडळ चर्चेसाठी आलेले नव्हते. मात्र, आता आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल होऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीत सरकारकडून कोणती भूमिका मांडली जाते आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय तोडगा निघतो, याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.