मराठा विद्यार्थ्यांना OBCप्रमाणे शैक्षणिक सवलती, वसतिगृह भत्त्यासाठी २०० कोटी, परदेशी शिष्यवृत्ती धोरणात बदल; १,४४० तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असतानाच राज्य सरकारने मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थी व तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी सरकारकडून एकाच वेळी चार शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. शैक्षणिक सवलती, वसतिगृह निर्वाह भत्ता, परदेशी शिक्षण आणि रोजगाराच्या संधींशी संबंधित या निर्णयांचा संबंधित विद्यार्थ्यांना आणि तरुणांना थेट फायदा होणार आहे.
मराठा विद्यार्थ्यांना OBCप्रमाणे शैक्षणिक सवलती
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात OBC विद्यार्थ्यांप्रमाणे उपलब्ध शैक्षणिक सवलती आणि विविध सुविधांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) राज्यातील सर्व विभागीय कार्यालये तसेच विद्यापीठांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे तंत्रशिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च आणि उपलब्ध सुविधांच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे.
वसतिगृह भत्त्यासाठी २०० कोटींची तरतूद
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्याचा लाभ मिळणाऱ्या EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेली ही रक्कम प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी वापरण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.
त्यामुळे भत्ता रखडलेल्या संबंधित विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या नियमांत बदल
सारथी संस्थेमार्फत परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या धोरणातही बदल करण्यात आले आहेत. नव्या व्यवस्थेनुसार परदेशातील विद्यापीठांची शिक्षण फी थेट संबंधित संस्थेला अदा केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमेवर असलेली कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे.
याशिवाय परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी १,५०० अमेरिकन डॉलर अतिरिक्त निर्वाह किंवा आकस्मिक भत्ता दिला जाणार आहे. यूकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिरिक्त भत्ता १,१०० जीबीपी असेल.
शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठांची निवड करताना QS Ranking वर आधारित नवीन गुणवत्ता यादी पद्धती लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
१,४४० मराठा-कुणबी तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण
शिक्षणासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यासाठीही सरकारने निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेने IDTRS पिंपरी-चिंचवड यांच्यासोबत सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणात LMV, HMV ड्रायव्हिंग तसेच कंडक्टर प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रशिक्षणासाठी कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला असून १ ऑक्टोबर २०२६ पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किमान १,००० लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची अट ठेवण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या या चार GRमध्ये शिक्षण, आर्थिक मदत, परदेशी शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह तरुणांसाठी हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.