अनधिकृत व्यवहार सुरू असल्याचा आरोप
परभणी (Pathri Sub-Registrar Offices) : पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयालगत असलेल्या एका खोलीतून कथितपणे अनधिकृत व्यवहार सुरू असून याठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित खोली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना मागासवर्गीय विभागाचे तालुका प्रमुख दिलीप हिवाळे यांनी प्रशासनास शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यासंदर्भात त्यांनी शुक्रवार १७ जुलै रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन दिले केले. निवेदनात म्हटले आहे की , पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या (Pathri Sub-Registrar Offices) शेजारील खोलीत संगणक प्रणाली व कार्यालयीन स्वरूपाची व्यवस्था करून तेथील व्यक्ती स्वतःला कार्यालयातील कर्मचारी असल्याचा भास निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून आर्थिक वसुली केली जात असून दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच खोटे दस्तऐवज तयार करून नोंदणी व्यवहार होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे . दरम्यान संबंधित खोली तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना ता. प्र. (मा.वि) दिलीप हिवाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.