मलंगगड परिसरातून आरोपी ताब्यात; हिललाईन पोलिसांचा तपास सुरू, मुंबई ATSकडूनही स्वतंत्र चौकशी
ठाणे : अंबरनाथ परिसरात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पासपोर्ट बाळगल्याच्या आरोपावरून चांद अली अब्दुल रशीद सैयद (वय ३८) याला पोलिसांनी अटक केली आहे. मलंगगड परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत असून, प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता मुंबई एटीएसनेही स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चांद अलीने २००९ मध्ये भारतीय पासपोर्ट मिळवला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात गेला. तेथे वास्तव्यास असताना त्याने भारतीय नागरिकत्वाची माहिती लपवून ‘चांद अली रशीद अली’ या नावाने कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे.
यानंतर पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारे त्याने भारतात प्रवेश केला आणि अंबरनाथ परिसरात वास्तव्य सुरू केले. भारतात परतल्यानंतर २०२४ मध्ये त्याने जुनी माहिती लपवून पॅन कार्ड, डोमिसाइल आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे पुन्हा भारतीय पासपोर्ट मिळवला, असा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.
पासपोर्ट पडताळणीत प्रकरणाचा उलगडा
या प्रकरणाचा धागा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील पडताळणी प्रक्रियेदरम्यान पोलिसांच्या हाती लागला. संबंधित व्यक्तीच्या नागरिकत्वासह कागदपत्रांबाबत संशय निर्माण झाल्यानंतर त्याची सखोल तपासणी करण्यात आली. त्यातून त्याच्याकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे अधिकृत अथवा बनावट पासपोर्ट असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिललाईन पोलिसांकडून तपास
हिललाईन पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून चांद अलीला अटक केली आहे. पाकिस्तानात तो किती काळ वास्तव्यास होता, तेथे त्याने कोणती कागदपत्रे मिळवली, भारतात परतल्यानंतर त्याच्या हालचाली काय होत्या आणि दोन्ही पासपोर्टचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.
मुंबई ATSचीही चौकशी
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई एटीएसनेही तपास सुरू केला आहे. आरोपीचे पाकिस्तानातील संभाव्य संपर्क तसेच भारतात परतल्यानंतर त्याचे कोणाशी संबंध होते, या बाबींचीही चौकशी सुरक्षा यंत्रणांकडून केली जात आहे.