Political Defection

‘आता फक्त मनसेत पाठवायचं बाकी!’; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा मिश्कील टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य राजकीय वाटचालीवरून सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले आहे.

‘आता फक्त मनसेत पाठवायचं बाकी!’; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा मिश्कील टोला

शरद पवार गटाच्या NDA प्रवेशाच्या चर्चांदरम्यान ‘ऑपरेशन टायगर-3’चीही चर्चा; शिंदे-पवार भेट आणि कर्जतमधील नव्या राजकीय समीकरणाने तर्क-वितर्कांना उधाण

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य राजकीय वाटचालीवरून सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले आहे. पक्षाचे खासदार वेगवेगळ्या पक्षांत जाणार असल्याच्या सातत्याने होणाऱ्या चर्चांबद्दल नाराजी व्यक्त करताना त्यांनी, ‘आता आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी आहे,’ असा उपरोधिक टोला लगावला.

नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. पक्षांतराच्या चर्चांचा संदर्भ देताना त्यांनी आपल्या आठ खासदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील गमतीजमतींचाही उल्लेख केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमचा आठ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. टीव्हीवर आम्हाला दररोज एका नव्या पक्षात पाठवले जाते. त्यामुळे आम्ही गमतीने म्हणतो की, आता फक्त मनसेमध्ये जाण्याचे बाकी आहे. आम्हाला कमोडिटीसारखे करून ठेवले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना इंटरनॅशनल करून टाका आणि ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचेही सांगा.” त्यांच्या या मिश्कील टिप्पणीने कार्यक्रमस्थळी हशा पिकला.

पक्षांतराच्या सततच्या चर्चांमुळे अस्वस्थता निर्माण होत असल्याचे सांगत अशा प्रकारे राजकीय नेत्यांबाबत विनोद केला जाणे दुर्दैवी असल्याची भूमिकाही सुळे यांनी मांडली.

‘ऑपरेशन टायगर-3’ची राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर-3’ची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता ठाकरे गटातील काही आमदारांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारही संपर्कात असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.

शिंदे गटातील सूत्रांच्या दाव्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 10 आमदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न झाले आहेत. पक्षांतरबंदी कायद्याच्या दृष्टीने आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यासाठी आणखी पाच आमदारांशी चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. ठाकरे गटातील आणखी एका खासदाराशी संपर्क साधल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांना संबंधित पक्षांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

‘ऑपरेशन टायगर-3’ची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय निलेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य राजकीय घडामोडींबाबत उत्सुकता वाढली आहे.

शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीने तर्क-वितर्क

या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधान भवनात झालेली शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेटही चर्चेचा विषय ठरली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळासाठी बैठकीतून बाहेर पडले आणि शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

याच काळात शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक विषयांवर या बैठकीत मार्गदर्शन होणार असल्याची माहिती होती. त्यामुळे बैठकीपूर्वी झालेल्या शिंदे-पवार भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले.

कर्जतमध्ये भाजप आणि शरद पवार गट एकत्र

राज्यपातळीवर संभाव्य नव्या समीकरणांची चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतच्या स्थानिक राजकारणात भाजप आणि शरद पवार गट एकत्र आले आहेत. कर्जत नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड झाली आहे.

नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. रोहिणी घुले यांना पदावरून दूर करण्याच्या राजकीय प्रक्रियेत भाजपचे राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घडामोडीमुळे कर्जत नगरपंचायतीवरील राम शिंदे यांचे वर्चस्व कायम राहणार आहे.

कर्जत-जामखेडच्या राजकारणात राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांचे प्रमुख राजकीय विरोधक मानले जातात. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा दोन वेळा पराभव केला आहे. मात्र, बदलत्या स्थानिक राजकीय परिस्थितीत दोन्ही बाजू एकत्र आल्याने नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
ओक्लाहोमाच्या जमिनीखालील उल्कागर्तेचा इतिहास बदलला; ४६७ नव्हे, ३७० दशलक्ष वर्षांपूर्वी धडक झाल्याचा नवा शोध

ओक्लाहोमाच्या जमिनीखालील उल्कागर्तेचा इतिहास बदलला; ४६७ नव्हे, ३७० दशलक्ष वर्षांपूर्वी धडक झाल्याचा नवा शोध

ओक्लाहोमातील Ames उल्कागर्तेचे वय नव्या संशोधनाने जवळपास १०० दशलक्ष वर्षांनी बदलले. झिरकॉन क्रिस्टल्सनुसार धडक ३७० दशलक्ष वर्षांपूर्वीची असू शकते.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026