मतदार यादी दुरुस्ती अर्जात चूक झाल्याचे सांगून APK फाईल पाठवली; बँक खात्यातून रक्कम लंपास
पुणे : मतदार यादी दुरुस्तीच्या प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदार यादी दुरुस्ती अर्जात चूक झाल्याचे सांगत संबंधित नागरिकाला विश्वासात घेण्यात आले. त्यानंतर बनावट फॉर्म आणि APK फाईल पाठवून त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवण्यात आली. या माहितीच्या आधारे सायबर चोरट्यांनी खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतली.
सध्या महाराष्ट्रात SIR अर्थात मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असून, शासनाने या प्रक्रियेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रशासकीय अधिकारी, बीएलओ आणि कर्मचारी मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबर भामट्यांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
नेमकी कशी झाली फसवणूक?
अलंकार पोलीस ठाण्यातील सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेले आहेत. ते पुण्यातील कर्वेनगर परिसरातील नवसह्याद्री सोसायटीत राहतात. ३० जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला.
मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत, तक्रारदारांनी भरलेल्या दुरुस्ती अर्जामध्ये काही त्रुटी असल्याचा दावा भामट्यांनी केला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला बनावट फॉर्म त्यांच्या मोबाइलवर पाठवण्यात आला.
हा फॉर्म भरताना पाच रुपये शुल्क द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी सायबर चोरट्यांनी त्यांना एक APK फाईल पाठवली. या फाईलमध्ये बँक खाते क्रमांकासह इतर माहिती भरण्यास सांगण्यात आले.
भामट्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने APK फाईलमध्ये बँक खात्याची आणि अन्य आवश्यक माहिती भरली. ही माहिती दिल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा ताबा मिळवला.
यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ४३ हजार रुपये काढण्यात आले. खात्यातून काढलेली रक्कम पुढे दुसऱ्या बँक खात्यातही वळवण्यात आली. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू
या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू आहे. सायबर चोरट्यांनी ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम वळवली, त्या खात्याची माहिती मिळवण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, SIRच्या नावाखाली कोणाकडूनही APK फाईल किंवा OTP मागितला जात असल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही माहिती देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती अथवा प्रक्रियेची अधिकृत खात्री करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.