आखाडा बाळापूर (Vehicle Theft) : कळमनुरी तालुक्यातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटना वरचेवर घडत आहेत. यामुळे या भागात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याची चर्चा होत आहे. मागील काही महिन्यांत दुचाकी चोरीच्या आठ घटना घडल्या आहेत. घोडा शिवारातून एक दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी २९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील सुरेश रमेश बुरकुले यांनी त्यांची दुचाकी घोडा शिवारात कालवा ओढ्याजवळ उभी केली होती. १४ मे रोजी ५० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात २९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून बिटप्रमुख राजेश घोंगडे पुढील तपास करत आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वी ७ मे रोजी कळमनुरी तालुक्यातील घोळवा रस्त्यावरील हॉटेलसमोर किशोर रत्नाकर मिरासे यांनी उभी करून ठेवलेली ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. तसेच खरवड येथील प्रकाश गौतम कांबळे यांनी त्यांची दुचाकी सासरवाडीत बउर घराजवळ उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याबाबत २१ मे रोजी बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी बोल्डा आठवडी बाजारात झाडाखाली उभी केलेली दुचाकी चोरीस गेली होती. तसेच जांब येथील सोनाजी तुकाराम टारफे यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी जांब शिवारात उभी केली असता १२ सप्टेंबर रोजी सकाळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. जामगव्हाण येथील दुचाकी वारंगाफाटा आठवडी बाजारातून चोरीस गेली होती.
उचाडा (ता. हदगाव) येथील शेतकरी ज्ञानेश्वर खंडोजी चव्हाण यांनी कृष्णापूर मंदिर परिसरात २५ ऑगस्ट रोजी ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी उभी केली असता ती चोरीस गेली होती. शोध घेऊनही दुचाकी मिळाली नाही. यामुळे २२ सप्टेंबर रोजी या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील राजू बंसी चव्हाण यांनी २३ सप्टेंबर रोजी आपल्या नातेवाईकांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत २५ सप्टेंबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा अनेक दुचाकी चोरीच्या घटना सतत घडत आहेत.
विविध भागांत दुचाकी चोरीच्या घटना
यापूर्वी आखाडा बाळापूर व कळमनुरी शहरासह डोंगरकडा, वारंगाफाटा, कामठाफाटा, वरूड, जवळापांचाळ आणि इतर भागांतही दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मध्यंतरी दुचाकी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, मागील काही महिन्यांत दुचाकी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे.