पर्यावरणासाठी एक हरित संकल्प!
परभणी (Tree Plantation) : परभणीतील गंगाखेड येथे गावाला हिरवेगार भविष्य देण्याच्या उद्देशातून बोर्डा येथील तरुणीने आजोबांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करत पर्यावरणासाठी एक हरित संकल्प करून ग्रामस्थांची मने जिंकत. ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’ या नावाने राबविलेल्या या उपक्रमाच्या (Activity) माध्यमातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
तरुणीने राबविला अनोखा सामाजिक उपक्रम!
तालुक्यातील बोर्डा येथील तरुणी स्वाती बालासाहेब राठोड हिने वाढदिवसाचे औचित्य साधून तिचे आजोबा स्वर्गीय थावरू (मामा) राठोड यांच्या स्मरणार्थ २७ झाडांचे वृक्षारोपण केले. केक कापणे किंवा नवीन कपडे घेणे टाळून तिने पर्यावरणपूरक (Environmentally Friendly) मार्ग निवडत गावाला हिरवेगार करण्यासाठी ‘एक झाड, अनंत आठवणी, अनंत आशीर्वाद’ या संकल्पनेतून एक सामाजिक संदेश देत “आजोबांच्या आठवणी गावात जिवंत ठेवून गावाला हिरवेगार बनविण्यासाठी टिकाऊ कार्य करणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.” असे स्वाती राठोड हिने म्हटले. तिला या कार्याची प्रेरणा आजोबांच्या कर्तृत्वातून तसेच आई-वडिलांच्या प्रगल्भ विचारांतून मिळाल्याचे सांगून, दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धारही तिने व्यक्त केला. या उपक्रमाची सुरुवात दत्तात्रय महाराज पुरी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून राम मुंढे, प्रा. गोविंद मुंडे, अशोक कदम, बंडू कदम, राजाभाऊ राठोड, हनुमान इचके आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील संजय मुंढे यांनी आपल्या वतीने १० वृक्षांची भेट देऊन या उपक्रमाला बळ दिले. ग्रामस्थांच्या मते, “स्वाती राठोड या तरुणीचा हा उपक्रम केवळ झाडे लावण्यापुरता नाही तर तो एक भावनिक संदेश आहे. ‘आठवणी जिवंत ठेवा आणि पृथ्वीला हिरवी करा’ या संकल्पनेमुळे गावात पर्यावरण संवर्धनाबाबत नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे.” याप्रसंगी गयाबाई कांदे, सवित्राबाई राठोड (आजी), रंजना नादरगे आदींसह रामेश्वर राठोड, मंगेश कदम, रोहिदास चव्हाण, अविनाश लटपटे, अभिजित राठोड, हनुमान शिंदे, नरसिंग पुट्टेवाड, सचिन पवार, दिपक कंडूकटले, मनोज शेवाळे, महेश चव्हाण, गजानन कांदे, सतीश देवळे, राहुल लटपटे, संग्राम राठोड, विकस सोनवणे, शिवा पवार, हिरा देवळे, विठ्ठल चव्हाण आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.