संचालक व कर्मचार्यां सहीत त्यांच्या नातेवाईकांच्याही मालमत्तेवर सहकार विभागाची नजर
हिंगोली (Hingoli Patsansth Case) : शहरातील महिला अर्बन को-ऑप क्रिडीट सोसायटी मर्या. हिंगोली व न्यु अर्बन को-ऑप क्रिडिट सोसायटी मर्या. या संस्थेमध्ये संचालकासह इतरांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ५८ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक, कर्मचार्यांच्या मालमत्तेवर टाच आणुन बोजा दाखल करण्याची प्रक्रिया सहाय्यक निबंधक कार्यालयाने सुरु केली आहे.
हिंगोली शहरातील नवा मोंढा भागामध्ये (Hingoli Patsansth Case) महिला अर्बन व न्यु. अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष जयेश खर्जुले , त्यांची पत्नी रोहिणी खर्जुले यांच्यासह संचालक व इतर कर्मचार्यांनी ग्राहकांनी गुंतवणुक केलेल्या जवळपास ४५ कोटी रुपयाचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात १९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये तब्बल ५८ आरोपींचा समावेश आहे. दरम्यान या पतसंस्थेत ज्या ज्या ठेवीदारांनी रक्कम गुंतवणुक केली होती.
त्यांची रक्कम त्यांना मिळाली नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रारीही केली होती. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे, सहाय्यक निबंधक माधव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विशेष लेखा परिक्षणात महिला अर्बन को-ऑप क्रिडीट सोसायटी मर्या. हिंगोली या पतसंस्थेत १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ३० कोटी ७८ लाख ९६ हजार ६६७ एवढ्या रक्कमेची अफरा तफर व ४ कोटी ४३ लाख ९१ हजार ६५७ ऐवढ्या रक्कमेचे आर्थिक नुकसान तर न्यु अर्बन को-ऑप क्रिडिट सोसायटी मर्या. या संस्थेमध्ये १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या दरम्यानच्या कालावधीत १२ कोटी १५ लाख ५९६ रुपयाचा अपहार व ६६ लाख ३४ हजार २९० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी दोन्ही गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवून आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकही नियुक्त केले होते. या पथकाने आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली असून त्यातील दोनजण न्यायालयीन कोठडीत तर उर्वरित ६ आरोपी पोलिस कोठडीत आहेत.
यामध्ये ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणही केले होते. या (Hingoli Patsansth Case) प्रकरणात पतसंस्थेचे ठेवीदार व सभासदाचे हित लक्षात घेवून पोलिस प्रशासन व सहकार विभागाकडून दोन्ही पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचार्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर बोजा चढविणे जप्तीची कारवाई देखील सुरु केली आहे. तसेच त्यांची मालमत्ता विक्रीस मनाई करण्याबाबतच्या हालचाली देखील सुरु केल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. ठेवीदार व नागरीकांनी आरोपींसहीत त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयास देण्याचे आवाहन सहाय्यक निबंधक माधव यादव यांनी केले आहे.