लसीकरण सेवेतल्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांचा संताप
तातडीने सेवा नियमित करण्याची मागणी
सेनगाव (Pusegaon Health Centre) : तालुक्यातील पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सेवा गेल्या काही दिवसांपासून अनियमित सुरू असल्याने ग्रामस्थांचा रोष ओसंडून वाहत आहे. महिलांना आणि लहान बालकांना होणाऱ्या प्रचंड गैरसोयीमुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (ता. १५) आरोग्य केंद्रास टाळा ठोक आंदोलन केले.
या आंदोलनास माजी पंचायत समिती सभापती गजानन पोहकर यांनी हजेरी लावून ग्रामस्थांच्या भावनांना पाठिंबा दिला. गावातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. (Pusegaon Health Centre) ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, “तातडीने लसीकरण सेवा नियमित सुरू करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला.
यावेळी ग्रामस्थांकडून आरोग्य केंद्रातील (Pusegaon Health Centre) कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. लसीकरणासंबंधी सातत्यपूर्ण सेवा न मिळाल्यास गावातील लहान मुले व गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने सुधारात्मक पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.