गिल नवा एकदिवसीय कर्णधार, बीसीसीआयच्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ
Team India new captain :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलची नवीन एकदिवसीय (ODI) कर्णधार म्हणून नियुक्ती करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या निर्णयानंतर चाहते आणि क्रिकेटमधील तज्ज्ञांनी बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या बदलामागील कारणांविषयी चर्चा सुरू झाली आहे.
मोहम्मद कैफचा रोहितला पाठिंबा; “तो २०२७ विश्वचषकापर्यंत कर्णधार राहायला हवा होता”
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने(Mohammad Kaif) रोहित शर्माच्या बाजूने आवाज उठवला आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये कैफ म्हणाला की, “रोहितने २०२७ च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करायला हवे होते.” त्याच्या मते, शुभमन गिलला एकाच वेळी इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणे धोकादायक ठरू शकते.
गिलवर वाढता भार; कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघात नेतृत्वाची जबाबदारी
अवघ्या दोन महिन्यांतच शुभमन गिलला (shubhman gill)भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सध्या तो टी-२० संघाचा उपकर्णधार आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवकडून (Surya Kumar Yadav)पूर्ण कर्णधारपद स्वीकारेल अशी अपेक्षा आहे. कैफच्या मते, ही जबाबदारी गिलवर अनावश्यक दबाव टाकू शकते.
“निर्णय घाईघाईने घेतला”; कैफचा बीसीसीआयवर अप्रत्यक्ष टोला
कैफने म्हटले की गिलची कर्णधारपदी नियुक्ती घाईघाईने आणि दबावाखाली झाली आहे. त्याने स्पष्ट केले, “मला वाटलं हे अपरिहार्य आहे, पण २०२७ च्या विश्वचषकानंतर होईल. गिल कसोटी संघाचे नेतृत्व करतो, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, आणि आता त्याला एकदिवसीय कर्णधारपदही मिळालं आहे. सगळं खूप लवकर घडत आहे.”
“रोहितने काय चूक केली?” — कैफ
रोहित शर्माच्या(Rohit Sharma) नेतृत्वगुणांचे कौतुक करताना कैफने या निर्णयाला “दुर्दैवी” म्हटलं. त्याने सांगितलं, “रोहितने कर्णधार म्हणून शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून संपवला. तरीही बीसीसीआयने त्याला पदावरून हटवलं. याचा त्याच्या पुढील कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.” कैफने थेट प्रश्न उपस्थित केला — “रोहित शर्माने नेमकं काय चूक केलं आहे?”
चाहत्यांचा रोष; “बीसीसीआयचा रोहितवरील विश्वास ढळला”
या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा रोष उसळला आहे. अनेकांनी रोहितवरील विश्वास गमावल्याचा आरोप बीसीसीआयवर केला आहे. काहींनी या निर्णयाला “अन्यायकारक” म्हणत रोहितला पुन्हा नेतृत्वाची संधी देण्याची मागणी केली आहे.