Darwah crime :- भारत फायनान्स कंपनीच्या आठ कर्मचार्यांनी मिळून तब्बल ६१ लाख ९ हजार ३८ रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध भादवि कलम ३१६(५), ३१८ (४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार राहुल साहेबराव गायकवाड यांनी २१ जूनला दिलेल्या तक्रारीनुसार, या कर्मचार्यांनी मागील एक वर्षात कर्ज परतफेडीच्या रकमेचा (EMI) गैरव्यवहार करून बँकेची फसवणूक (Fraud) केली.
एक वर्षात कर्ज परतफेडीच्या रकमेचा गैरव्यवहार करून बँकेची फसवणूक
या प्रकरणातील आरोपींमध्ये अभिषेक विकास ढाकुलवार (रा. काठोडा, यवतमाळ), श्याम प्रकाश घोडेवार (रा. कळमा, ता. हातगाव, जि. नांदेड), आकाश व्यंकट तिरमले (रा. खामटाला, किनवट), अजय दिलीप डखरे (रा. श्रीरामपूर, पुसद), जय सुरेश चव्हाण (रा. शेलू ब्राह्मणवाडा, दारव्हा), अक्षय राजेश गवई (रा. डोल्हारी, दारव्हा), पवन अशोक परिसे (रा. तिवसा, अमरावती) आणि वैष्णवी संजय चारकोड (रा. शेलोडी, दारव्हा) यांचा समावेश आहे. हे सर्वजण भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी असून, त्यांनी कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या खिशात टाकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षात वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम (ईएमआय) या कर्मचार्यांनी कर्जदारांकडून गोळा केली. मात्र, ही रक्कम बँकेत जमा न करता, त्यांनी परस्पर गैरव्यवहार केला. या कृत्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान (financial loss) झाले आहे. तक्रारदार राहुल गायकवाड यांनी याबाबत दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला.
या घोटाळ्यामुळे स्थानिक बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून, कर्ज वाटप आणि वसुली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मागील काही महिन्यांमध्ये शहरातील जन संघर्ष अर्बन निधी, जय किसान मायक्रो फायनान्स कंपनी, आरोहन मायक्रो फायनान्स आणि आता भारत फायनान्स कंपनीतील अपहार प्रकरणामुळे सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.