33 गावांमध्ये उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार!
चाकूर (Cemetery) : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…’ सुरेश भटांनी या कवितेतून मरणही सुसह्य असल्याचे सांगितले असले, तरी 20 गावांना स्मशानभूमी नसलेल्या आणि 33 गावांमध्ये उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या चाकूर तालुक्यात पावसाळ्यामुळे सरण विझण्याची वेळ आल्याने गावकऱ्यांना (Villagers) अनंत यातना भोगाव्या लागत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री असलेले राष्ट्रवादीचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात ही दुरवस्था आहे.
लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही दुर्लक्ष कायम!
चाकूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावाला दहनभूमी, दफणभूमी जागा नाही, स्मशानभूमी शेडच नाही, शवदाहिनींची दुरवस्था (Bad Condition) झाली आहे. परिणामी स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात अथवा नदी-नाल्याकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गावागावांमध्ये आली आहे. अशात पाऊस सुरू झाल्यास रचलेले सरण विझण्याच्या बिकट प्रसंगास सामोरे जावे लागत असल्याने, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने (Administration) या मुलभूत सुविधेकडे गांभीर्याने लक्ष देऊन मृतदेहाची होणारी अवहेलना, विटबंना थांबवावी, अशी केविलवाणी मागणी सर्व नागरिकातून होत आहे.
स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते कच्या स्वरूपातील!
चाकूर तालुक्यात 71 ग्रामपंचायती आणि 81 गावे आहेत. यातील 15 गावांमध्ये अधिकृत दहनभूमी नाही, 20 गावात दफणभूमी नाही तर 33 गावांमध्ये स्मशानभूमी शेडच नाही. कांही गावांमध्ये स्मशानभूनी नावापुरतीच उभी आहे. अनेक ठिकाणी मृतदेहास अग्नी देण्याकरीता आवश्यक असलेले शेड सुस्थितीत नसून, शवदाहिनींची दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते कच्या स्वरूपातील असल्याने पावसाळ्यात अंत्यविधीस येणाऱ्यांना चिखल तुडवावा लागत आहे. स्मशानभूमीच्या परिसरात उगवणारी निरुपयोगी झाडे, गवतही पावसाळ्याच्या दिवसांतील डोकेदुखी आजही कायम आहे.
खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी खेडी आजही विकासापासून कोसोदूर…
देशासह महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात (Economic Development) ग्रामीण भागातील खेड्यांचा मोठा वाटा असला तरी, खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारी खेडी आजही विकासापासून कोसोदूर आहेत. तालुक्यातील अनेक गावे, वाडी, वस्ती, तांड्यांवर आजही मूलभूत सुविधांचा मोठा अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. म्हणून शासनाने स्मशानभूमी व दफणभूमी साठी जागा तसेच स्मशानभूमी शेड, रस्ता, अदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी आवश्यक!
जीवन जगत असताना विविध समस्याचा धैर्याने सामना करणाऱ्याची मृत्यूनंतर तरी अवहेलना व्हावयाला नको, यासाठी प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमीशेड, बैठक व्यवस्थेसह सुसज्ज स्मशानभूमी असायला हवी. प्रत्यक्षात अनेक गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने शेतांमध्ये अंत्यविधी उरकावा लागत आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यात अडचण जाणवत नाही. मात्र पावसाळ्यात हा प्रश्न गंभीर होतो त्यामुळे गाव तिथे सुसज्ज स्मशानभूमी असायालाच हवी.
– नागीण पाटील, सरपंच
त्या घटनेनंतरही शेळगावकडे दुर्लक्ष!
गतवर्षी शेळगाव येथे पोलीस पाटील यांचे निधन झाले. अंत्यसंस्काराची वेळ निश्चित करणयात आली. त्यानुसार पाहुणे मंडळीनी हजेरी लावली. मात्र त्याचवेळी पाऊस सुरु झाल्याने आधी पत्र्याचे शेड उभारावे लागले आणि नंतरच अंत्यसंस्कार पूर्ण करता येणे शक्य झाले. तसेच नदीच्या काठावर सरण रचले असता पुरामध्ये प्रेत वाहून जाण्याचा प्रसंग घडला, प्रेताची विटंबना झाली. नागरिकांतून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्व वरीष्ठ अधिकारी गावाला भेट दिली, मात्र स्मशानभूमी शेड शासनाने आजपर्यंत मंजूर केले नाही.
– मनोज नानासाहेब पाटील
दहनभूमी नसलेली गावे….
तिवटघाळ, तळघाळ, मुरंबी, लातूर रोड, मांडूरकी, हटकरवाडी, भाकरवाडी, मष्णेरवाडी, नळेगाव, संगाचीवाडी, मंहाडोळ, सांडोळ,ब्रम्हवाडी, नागेशवाडी या गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्मशानभूमीची जागाच नाही.
स्मशानभूमी शेड नसलेले गावे!
तिवटघाळ, तळघाळ, मुरंबी, शिवणखेड(बु.), जगळपूर, लातूर रोड, मांडूरकी, नागदरवाडी, हटकरवाडी, भाकरवाडी, ब्रम्हवाडी, टाकळगाव, बोरगाव(बु), झरी(बु), घारोळा, मष्णेरवाडी, झरी(खु), नळेगाव, तिर्थवाडी, ब्रम्हवाडी, शिरनाळ, शेळगाव, संगाचीवाडी, मंहाडोळ, सांडोळ, हाडोळी, मोहदळ, ब्रम्हवाडी, नागेशवाडी, रायवाडी, राजेवाडी, बोथी, बावलगाव.
दफणभूमी नसलेले गावे!
दापक्याळ, लातूर रोड, माडूंरकी, बोथी, कबनसांगवी, मष्णेरवाडी, बावलगाव, टाकळगांव कडमूळी, मंहाडोळ, सांडोळ, शेळगाव, संगाचीवाडी,चवळेवाडी, लिंबाळवाडी, तीवघाळ, तीवटघाळ, तळघाळ, मूरंबी, बेलगाव आदी गावात अधिकृत दफणभूमी नसल्याने शेतामध्ये, इतरत्र अंत्यविधी करावे लागतात.