वागदरी येथील स्मशानभूमीवर पोहोचण्यासाठी ग्रामस्थांची कसरत!
उदगीर (Cemetery) : कोटीच्या कोटी विकासाची उड्डाणे झाली तरीही उदगीर तालुक्यातील वागदरी येथे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तब्बल कमरेइतक्या पाण्यातून न्यावा लागतो. मुळात बहुजनांच्या स्मशानभूमीचे विद्रूपीकरण केले जात असतानाच अशा स्मशानभूमींवर पोहोचण्यासाठी रस्तेही नाहीत, हे विदारक सत्य आहे.
उदगीर तालुक्यातील वागदरी येथील एका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी नदीतून जीव धोक्यात घालून मृतदेह न्यावा लागतो. अतिवृष्टीने या नदीला मोठया प्रमाणावर पाणी असल्याने अंत्यविधीसाठी खोल पाण्यातून जातानाचे धक्कादायक वास्तव वागदरी येथे पाहायला मिळाले. वागदरी येथे गावाजवळ मोठी नदी असून नदीच्या पलिकडे स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात गावात एखाद्या व्यक्ती मयत झाला नदीला जर पूर आला तर मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठया अडचणीला सामोरे जावे लागते. १२ ऑक्टोबर, रविवारी वागदरी येथे काशिनाथ सोनकांबळे यांचे निधन झाले. त्यांच्यावर १३ ऑक्टोबर रोज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना (Citizens) चक्क नदीच्या पाण्यातून कसरत करत जावे लागले.
त्रासाकडे प्रशासन लक्ष देईल का? असा संतप्त सवाल
या गावातील लोकांना मरणा नंतर ही यातना भोगाव्या लागतात याचे विदारक चित्र समोर आले आहे. गावोगाव विकासाची कोटीची उड्डाने होवून ही स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही, ना रस्त्यावर पूल नाही. त्यामुळे मरणानंतर ही अंत्यसंस्कार सुध्दा त्रासाविना करता येत नाही. या त्रासाकडे प्रशासन (Administration) लक्ष देईल का? असा संतप्त सवाल वागदरी ग्रामस्थातून उपस्थित केला जात आहे.
स्मशान भूमीकडे जाणार्या रस्त्यावर पूल उभारावा!
गावातील एका स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीतून जावे लागते.पावसाळयात व पूर आल्यावर स्मशानभूमीकडे जाताना पाण्यातून कधी-कधी पोहत जावे लागते. मरणानंतर ही स्मशानभूमीकडे जाताना ही त्रास सोसावा लागतो. याविषयी लोकप्रतिनिधींना ही सांगितले. त्यांनी या रस्त्याची पाहणी केली तरी पूल झाला नाही, अशी प्रतिक्रिया सरपंचासह ग्रामस्थ पांडुरंग उदगीरे यांनी दिली.