आमदार रमेशआप्पांच्या दमदार नेतृत्वावर झाले शिक्कामोर्तब!
लातूर (CM Devendra Fadnavis) : वंचितांचे नेते, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणाच्या दणदणीत कार्यक्रमातून भाजपामध्ये आमदार रमेशआप्पा कराड यांच्या दमदार नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले असून, जिल्ह्यामध्ये भाजपाचे दमदार नेते अशी प्रतिमा या कार्यक्रमातून पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रमेशआप्पा कराड यांच्या कौतुकाचे सोडलेले ‘वाक्बाण’ जिव्हारी लागलेले भाजपातील नेतृत्वाचे पत्ते धडाधड कोसळून पडले आहेत.
जिल्ह्यातील नेतृत्वाचे पत्ते धडाधड कोसळले…
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात मागच्या काळात भाजपाचा बालेकिल्ला निर्माण झाला. हा बालेकिल्ला निर्माण होण्यासाठी भाजपातील सर्वच गट गटांचा हातभार असला, तरी त्यामागे विरोधी पक्षाचाही हातभार असल्याचे लातूरकर जाणून आहेत. मागच्या काळात भाजपाचे नेतृत्व संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे होते. मात्र नंतरच्या काळात नेतृत्वाचा केंद्रबिंदू हळूहळू औसा विधानसभा मतदारसंघाकडे सरकला. प्रतिसरकार प्रमाणे लातूर जिल्ह्यातही प्रति पालकमंत्री म्हणून औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र नेतृत्वाच्या स्पर्धेत रमेश आप्पा कराड कधीच आले नव्हते. आपला मतदारसंघ आणि आपले काम, हेच ध्येय नजरेसमोर ठेवलेल्या आप्पांनी नेतृत्वासाठी कधीच अट्टाहास किंवा आटापिटा केला नाही. मात्र केलेल्या कामाची पोच पावती त्यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinathrao Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातून दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीच दिल्याने जिल्ह्यातील नेतृत्वाचे पत्ते धडाधड कोसळले आहेत.
परिश्रम निश्चितच कौतुकास्पद!
पूर्णाकृती पुतळा अनावरणाचा कार्यक्रम आमदार रमेश आप्पा कराड (MLA Ramesh Appa Karad) यांनी अत्यंत नियोजनबद्ध रित्या पार पाडण्यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद होते. या कार्यक्रमात रमेश आप्पा कराड यांनी भाजपातील दुसऱ्या फळीतील सर्वच नेत्यांना सन्मान देण्याचे काम केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. व्यासपीठावरील नियोजनाबरोबरच कार्यकर्त्यांचे नियोजन करण्यात तसूभरही कमतरता रमेशआप्पांनी ठेवली नाही, हे विशेष. शहर जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्या संपूर्ण जबाबदारीची उणीव रमेश आप्पांनी भरून काढल्याचे या कार्यक्रमात स्पष्ट झाल्याने लातूर जिल्ह्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वारस म्हणवून रमेशआप्पा सिद्ध झाले आहेत.
नेतृत्वाच्या ‘रील्स’ही ‘वॉश आऊट’!
लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला जिल्हाध्यक्ष बाहेरच्या जिल्ह्याचा नेमला गेला आहे. त्या पक्षाच्या धोरणाचा हा भाग असला, तरी लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष उपलब्ध व्हावा, असे वाटणे चुकीचे नाही. शिवाय लातूर जिल्ह्यात नेतृत्वाचे अनेक बेट तयार झाल्याचे मागच्या काळात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या देखण्या कार्यक्रमाच्या झपाट्यात अनेक ‘रील स्टार’ नेत्यांच्या नेतृत्वाच्या ‘रील्स’ही ‘वॉश आऊट’ झाल्या, असे म्हटले तर वावगे ठरू नये.