गंगाखेड शहरातील परळी नाक्यावरील घटना; मयत नगर परिषदेचे कर्मचारी
परभणी (Gangakhed Accidental Death) : गंगाखेड येथे दुचाकीवरून जाणार्या दोघांना ट्रकने चिरडल्याने नगर परिषदेतील दोन कर्मचार्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात गुरुवार १६ जुलै रोजी दुपारी ४:३८ वाजता घडली आहे. रस्त्याच्या मधोमध चौकातच असलेल्या खड्डयामुळे अपघात झाल्याचे समजल्याने मयतांचे नातेवाईक व शहर वासियांनातून संताप व्यक्त करत रस्ते दुरुस्ती विभागातील संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्या जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, परळी रस्त्यावरून येत परळी नाक्यावरील चौकातून परभणीच्या दिशेने जाणारी दुचाकी चौकातील खड्डयात पोहचताच पाठीमागून विटा घेऊन येणार्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन दुचाकीवरील दोघांना चिरडल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर असलेले मुनवर छोटूमियाँ शेख वय ५५ वर्ष रा. मोमीनपुरा गंगाखेड व संतोष प्रल्हादराव साळवे वय ५२ वर्ष रा. डॉ. आंबेडकर नगर गंगाखेड या नगर परिषदेत कार्यरत दोन्ही कर्मचार्यांचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची घटना समजताच रुग्णवाहिका चालक हनुमान इंगळे, संतोष राष्ट्रकुट, रावण भालेराव आदींनी घटनास्थळी धाव घेत किरण धापसे व अन्य नागरिकांच्या मदतीने दोघांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक कातकडे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या अपघातात नगर परिषदेच्या दोन कर्मचार्यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांसह शहरवासियांनी घटनास्थळ व उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. गंगाखेड पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोउपनि वैजनाथ आदोडे, पो.शि, ज्ञानोबा गव्हाणे, सुनिल मामीलवाड, सपोनि ज्ञानदेव सानप, पोउपनि राहुल लोखंडे, पोह मारोती माहोरे, पोह संदीप जाधव आदींनी अपघात ग्रस्त ट्रक व दुचाकी पोलीस ठाण्यात नेत वाहतूक सुरळीत केली. परळी नाका चौकातील खड्डयामुळे अपघात होऊन दोघांचा मृत्यु झाल्याने यास रस्ते दुरुस्तीचे काम पाहणार्या महामार्ग विभागातील अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्या जात आहे.