गृहप्रमुख, गृहपाल यांच्या नातेवाईकांनाच दिले कंत्राट
सामाजिक कार्यकर्ते संजय सोळंके यांची तक्रार
अमरावती (Adiwasi Hostel Corruption) : आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये (Adiwasi Hostel Corruption) साहित्य पुरवठ्याच्या नावाखाली गेली आठ-दहा वर्षे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सोळंके यांनी केला आहे. नवसारी येथिल वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य नाममात्र पुरवून शासनाचा पैसा लाटण्याचा गंभीर प्रकार गृहप्रमुख, गृहपाल आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या संगनमताने होत असून, त्यांच्याच नातेवाईकांच्या दुकानांना, महिला बचत गटांना आणि संस्थांना निविदा मिळवून देऊन शासनाच्या निधीवर डल्ला मारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
साहित्य पुरवठ्याच्या बिलांमध्ये मोठमोठ्या रकमांची नोंद करून प्रत्यक्षात साहित्य अत्यल्प दिले जाते, तर कुटुंबातील सदस्यांना रोजंदारी कर्मचारी म्हणून दाखवून त्याच व्यक्तींना पुरवठादार बनवले. गृहप्रमुख व गृहपाल यांनी आपल्या नातेवाईकांना रोजंदारी कर्मचाऱ्याच्या नावे नियुक्ती देऊन त्यांच्याच नावाने पगार व (Adiwasi Hostel Corruption) पुरवठ्याची बिले काढली जात असल्याने शासनाची दिशाभूल होत असल्याचेही उघड झाले आहे. या संपूर्ण भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा निधी थेट अधिकार्यांच्या व ठेकेदारांच्या खिशात जात आहे.
याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी तसेच अपर आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे वारंवार तक्रारी देण्यात आल्या तरी अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे आणि हलगर्जीपणामुळेच भ्रष्टाचार फोफावत असून विद्यार्थ्यांच्या हक्काचे पैसे लुटले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.संजय सोळंके यांनी मागणी केली आहे की मागील आठ ते नऊ वर्षांतील सर्व साहित्य पुरवठ्याची देयके खातेनिहाय तपासली जावीत, (Adiwasi Hostel Corruption) रोजंदारी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची पडताळणी करून ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नातेवाईक तर नाहीत ना याची चौकशी व्हावी आणि संपूर्ण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा उभारण्याचा इशारा सोळंके यांनी दिला आहे.
दोन वर्षांपासून निविदा प्रक्रिया राबविली- गृहप्रमुख
संबंधित प्रकरणातील तक्रारीसंदर्भात नवसारी येथील (Adiwasi Hostel Corruption) वस्तीगृहाच्या गृहप्रमुख पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन वर्षांपासून निविदा प्रक्रिया राबविली नसल्याचे सांगितले. मागील काही वर्षात जी निविदा प्रक्रिया पार पडली तसेच सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती विचारली असता त्याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.