लोकनाथ काळमेघ
अकोला (El Niño Warm Year 2027) : जगावर मोठ्या हवामान संकटाची छाया निर्माण झाली आहे. प्रशांत महासागरात विकसित होत असलेला एल-निनो अत्यंत तीव्र होण्याचा इशारा ब्रिटनच्या हवामान विभागाने दिला आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान काही भागांत सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसहून अधिक वाढण्याचा अंदाज असून, ही घटना गेल्या अनेक दशकांतील सर्वात शक्तिशाली एल-निनोपैकी एक ठरू शकते. या हवामान बदलाचा परिणाम जगभरातील पावसाच्या चक्रावर होण्याची शक्यता आहे.
आफ्रिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आशियातील अनेक भागांमध्ये दुष्काळ, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटांचा धोका वाढू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमानुसार, या एल-निनोमुळे २०२७ (El Niño Warm Year 2027) अखेरपर्यंत जवळपास ५ कोटी अतिरिक्त लोक तीव्र अन्नटंचाईच्या संकटात सापडू शकतात. सध्या ४५ देशांतील सुमारे २२ कोटी ५० लाख लोक तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत.
भारतासाठी हा इशारा अधिक गंभीर आहे. (El Niño Warm Year 2027) मान्सूनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या शेतीला पावसातील अनियमिततेचा फटका बसू शकतो. खरीप पिकांचे उत्पादन घटल्यास अन्नधान्य आणि इतर कृषी वस्तूंच्या किमती वाढण्याचा धोका आहे. भारतात यंदाचा मान्सून आधीच सरासरीपेक्षा १३ टक्के कमी आहे. ब्रिटनच्या हवामान विभागानुसार, एल-निनोच्या उष्णतेच्या परिणामामुळे २०२७ हे २०२४ पेक्षा अधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. मात्र, हे अंदाज आहेत; परिस्थिती पुढील हवामान निरीक्षणांनुसार बदलू शकते.