१६ सप्टेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा; शेतकरी, शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन
मानोरा : तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासह शेतकरी, शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी, १६ सप्टेंबर २०२६ रोजी मानोरा येथे भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी केले आहे.
मानोरा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, फसवी कर्जमाफी बंद करून सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच नवीन शेतकरी कर्ज पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे थेट बँकेमार्फत उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. सन २०२५-२०२६ मधील पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशीही मागणी आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यासोबतच दरमहा १० हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. घरकुल बांधकामाचे प्रलंबित हप्ते तातडीने देऊन वंचित लाभार्थ्यांना नवीन घरकुल मंजूर करावे, तसेच अतिक्रमणे नियमानुकूल करून नमुना ८-अ देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत आणि रेशन दुकानांमधून साखर व तेलाचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी आहे. शैक्षणिक धोरणात सुधारणा करण्याबरोबरच एमपीएससी, यूपीएससी आणि नीटसह विविध क्षेत्रांतील पेपरफुटीच्या प्रकरणांवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रातील प्रश्न सोडवावेत, जिल्हा परिषदांच्या नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करून तेथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा मिळावा आणि स्मार्ट मीटर बसविणे बंद करून त्याबाबत कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये, अशीही मागणी आहे.
खचलेल्या विहिरी तसेच सिंचन विहिरींच्या बांधकामाची प्रलंबित रक्कम तातडीने देण्यात यावी. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या हाताला काम आणि पोटाला भाकर मिळेल, यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मानोरा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा आणि शालेय पोषण आहार योजना नियमितपणे सुरू ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. जंगली जनावरांमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई द्यावी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पांदण रस्ते खुले करून त्यांची तातडीने निर्मिती करावी तसेच बंद करण्यात आलेली आदिवासी समाजाची खावटी योजना पुन्हा सुरू करावी, या मागण्यांचाही मोर्चात समावेश आहे.
दरम्यान, देशाला नवीन दिशा व मार्गदर्शन देऊन न्याय मिळवून देणारे आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब आणि कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या छायाचित्राचा दुग्धाभिषेक यावेळी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सर्व मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश महामोर्चात शेतकरी, शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार अनंतकुमार पाटील तसेच महाविकास आघाडी, तालुका मानोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.