पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा, पण प्रवेश नाकारल्याने परीक्षा केंद्राबाहेर वडील-मुलगी भावुक; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
विदिशा (Late Entry) : डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून नीट (NEET) परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. मात्र, काही मिनिटांचा उशीरही त्यांची वर्षभराची मेहनत वाया घालवू शकतो. अशाच एका विद्यार्थिनीला री-नीट परीक्षेसाठी काही मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेनंतर परीक्षा केंद्राबाहेर तिच्या वडिलांनी व्यक्त केलेला आक्रोश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीचे वडील परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांसमोर हात जोडून मुलीला परीक्षा देण्याची संधी देण्याची विनंती करताना दिसतात. मात्र, नियमानुसार वेळ संपल्याने विद्यार्थिनीला आत प्रवेश मिळू शकला नाही. यानंतर संताप आणि हतबलतेच्या भरात त्यांनी परीक्षा केंद्राच्या लोखंडी गेटवर डोके आपटले. त्यावेळी उपस्थित असलेल्या मुलीने आणि इतर नागरिकांनी त्यांना आवर घातला. विद्यार्थिनीही या प्रसंगामुळे भावनिक होऊन अश्रू अनावर झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही काही मिनिटांच्या विलंबामुळे विद्यार्थिनीला परीक्षा देण्याची संधी नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षा केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
A heartbreaking scene from Vidisha, Madhya Pradesh. 💔 At the Girls' College Re-NEET examination centre, three students missed their chance to appear for the exam due to a slight delay, biometric issues, and an admit card mistake. Behind every aspirant stood parents carrying… pic.twitter.com/FpSfBsf8Nv
— Orugallu Adda (@OrugalluAdda) June 22, 2026
पेपरफुटीवर वडिलांचा संताप
माध्यमांशी बोलताना विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने ३ मे रोजी झालेली मूळ नीट परीक्षा दिली होती. मात्र, त्या परीक्षेचा पेपर फुटल्याने फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली. त्यांनी संताप व्यक्त करत विचारले की, "पेपर लीक झाला तेव्हा नियम कुठे होते? सरकार कुठे होते? त्यात आमचा काय दोष होता? आणि आज फक्त काही मिनिटांचा उशीर झाला म्हणून माझ्या मुलीला परीक्षा द्यायलाच मिळत नाही." हे सांगताना वडील आणि मुलगी दोघेही भावूक होऊन रडू लागले.
मुलीच्या शिक्षणासाठी विकली संपत्ती
सोशल मीडियावरील दाव्यानुसार, ही घटना मध्य प्रदेशातील विदिशा येथील आहे. विद्यार्थिनीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी आपली जमीन-जुमला विकून नीटच्या कोचिंगची व्यवस्था केली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी विविध कामे केली, तर मुलीनेही घरापासून दूर जाऊन कोचिंग घेत दिवस-रात्र अभ्यास केला.
३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत ती सहभागी झाली होती. मात्र, पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या री-नीट परीक्षेला काही मिनिटांच्या उशिरामुळे तिला बसता आले नाही. त्यामुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी राहिल्याची भावना व्यक्त केली जात आहे.