Dhanora :- गोवंशाची तस्करी करणार्या कंटेनरचा अपघात (Accident) झाल्याने गोवंश तस्करीचा पर्दाफाश झाल्याची घटना आज २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास पेंढरी नजीकच्या गट्टा गावाजवळ घडली. या अपघातात कंटेनरमधील १६ जनावरांचा मृत्यू झाला तर ८ जनावरे जिवंत आढळली. मात्र अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
१६ जनावरांचा मृत्यू, ८ आढळले जिवंत
मोठ्या कंटेनरमध्ये निर्घृणपणे कोंबून आणि अवैधपणे गोवंशांची (bovine) वाहतूक करताना एक भीषण अपघात घडला. पेंढरी जवळील गट्टा गावाच्या जवळ वाहन उलटल्याने तब्बल १६ जनावरांचा जागीच मृत्यू झाला असून, ८ जनावरे जिवंत आढळली आहेत.ही जनावरे पेंढरी परिसरातून कत्तलीसाठी नेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा प्रकार रात्री उशिरा घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला फसल्याने जनावरे तस्करीचा प्रकार उघडकीस आली.
घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व संबंधित अधिकार्यांना याची माहिती दिली.दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत जनावरे आणि वाहन गट्टा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उप निरीक्षक योगेश तपकीरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा अवैध गोवंश वाहतूक आणि त्यामागील साखळी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.




