लातूर (Latur):- एकूण 224.093 दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणामध्ये सध्या जवळपास 216 दलघमी पाणीसाठा आला असून धरण 96 टक्के भरल्याने धरणातून बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन वक्रद्वारे उघडून धरणातून मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मांजरा धरण भरल्याने लातूर बीड व धाराशिव जिल्ह्यातील काही शहरे व गावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक
गेली दोन दिवस मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक होत आहे. धरणात पाण्याचा आवक दर ताशी 94.41 क्युमेक्स असून ही आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने बुधवारी (दि. 25) दुपारी 12.30 वाजता मांजरा धरणाचे पहिल्या व सहाव्या क्रमांकाची 2 वक्रद्वारे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1730 क्यूसेक (49.00 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणात (Dam)पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे, मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




