परभणी/पूर्णा(Parbhani) :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विशाल कदम यांच्या शिवसेना प्रवेशामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र…!
नांदेडमधील मार्वेâट कमिटीच्या मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आ. हेमंत पाटील, आ. गुलाबराव पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. बाबुराव कदम कोहलिकर, आ. संतोष बांगर, शिवसेनेचे नेते आनंद भरोसे, माजी आ. हरिभाऊ लहाने आदींची उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख विशाल कदम हे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात सुपरिचित आहेत. कदम यांनी खा. संजय जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. कदम यांनी पूर्णा नगर पालिकेवर वर्षानूवर्षे सत्ता जनतेचा विश्वास संपादन करुन गाजवली आहे. पूर्णा नगरपालिकेत ते स्वतः चारवेळा सदस्य होते. एकदा उपनगराध्यक्ष व एकवेळेस नगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
नांदेडमध्ये पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे वरिष्ठ नेते मंडळी हजर
२०१९ ची विधानसभा निवडणुकीत देखील ते दोन नंबरवर राहीले होते. तर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत खा. जाधव यांनी संपूर्ण शक्ती कदम यांच्या पाठीशी उभी केली होती. गंगाखेड विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पराभूत झाल्यानंतर कदम हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ होते. परंतु भविष्यातील स्वतःच्या राजकीय वाटचालीचा विचार करुन पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, त्यातील पूर्णा शहरासह तालुक्यातील राजकीय स्थिती, जाती-पातीची गणिते, समिकरणे व त्यांच्यासमोरील राजकीय आव्हाने ओळखून कदम यांनी शिंदे गटात प्रवेशाचा ठोस निर्णय घेतला. पाठोपाठ नांदेड येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पुर्णेतील राजकिय पटावर आता एक नवा अध्याय सुरु झाला आहे. आपल्या हजारो समर्थकांना सोबत घेऊन हा प्रवेश झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. पुढील राजकीय वाटचालीस या त्यांच्या निर्णयाने एक नवे वळण मिळाले आहे.