शासकीय कंत्राटदारांची चार महिन्यांपासून देयके थकली
हिंगोली (MGNREGA Yojana) : मनरेगा योजनेंतर्गत काम करणार्या अकुशल मजुरांसोबत शासकीय कंत्राटदारांच्या कुशल कामांची देयके मागील चार महिन्यांपासून थकलेली आहेत. शासनाच्या दिरंगाईमुळे हजारो कष्टकरी कुटुंबांची दिवाळी अक्षरशः अंधारात जाणार आहे.
गावोगावी मनरेगा (MGNREGA Yojana) अंतर्गत चालणारी रोपवाटिका, रस्ते व नालेबांधणी, जलसंधारणाची कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत. चार महिन्यांपासून एकाही मजुराला मजुरी न मिळाल्याने त्यांच्या घरातील चुली विझल्या आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने मिळत असली, तरी प्रत्यक्ष निधी मात्र मिळालेला नाही.शासनाच्या या दिरंगाईला कंटाळून रोप-वाटिकांवर काम करणार्या मजुरांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
परिणामी कोट्यवधींची झाडे सुकत असून संपूर्ण प्रकल्प धोक्यात आला आहे. फक्त (MGNREGA Yojana) मजुरांचेच नव्हे तर शासकीय कंत्राटदारांचेही कुशल कामांचे बिल महिनो-महिने थकले आहेत. ग्रामपंचायतींच्या विकासकामांना निधी मिळत नसल्याने स्थानिक विकास ठप्प झाला आहे.तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना जसे की सिंचन विहीर, शेततळे, बांध बांधणी आणि जलसंधारणाची कामे पूर्ण करणार्या शेतकर्यांनाही शासनाने देयके दिलेली नाहीत. अनेक शेतकर्यांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली, मात्र निधी न मिळाल्याने त्यांची परतफेड करणे अवघड झाले आहे.
शेतकरी आणि मजुरांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त होत असून ग्रामपंचायती व पंचायत समित्या निधीच्या मागण्या पाठवत आहेत, पण प्रशासन ठरल्याप्रमाणे गप्प असल्याचा आरोप कामगारांचा आहे. शासनाने कष्टकरी मजुरांची मजुरी, कंत्राटदारांची बिले आणि शेतकर्यांची थकीत रक्कम तत्काळ द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक सामाजिक संघटनांनी सरकारला दिला आहे.