मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांची माहिती
लातूर (Panchayat Raj Mission) : ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यासह त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यासह लातूर जिल्ह्यात आजपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमार्फत 31 डिसेंबरपर्यंत हे सदर अभियान राबविले जाणार असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गाव स्तरावर विकास साधण्यासाठी, यात विशेषतः सरकारकडून नव्हे तर ग्रामीण भागतून सुरू होणारे मुख्यमंत्री पंचायत समृद्ध अभियान यातून लातूर जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक (Panchayat Raj Mission) ग्रामपंचायतीला स्वावलंबी व आदर्श बनविण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.
या (Panchayat Raj Mission) अभियानाच्या माध्यमातून गावाच्या मूलभूत सोयीसुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, शेतीसंबंधी सुविधा, रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच ग्रामपंचायतींची आर्थिक उभारणी, शाश्वत विकासाचे नियोजन आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे देखील या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असेल.गावपातळीवर विकासाची गती वाढविण्यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, ग्रामपंचायतींना निश्चित कालावधीत ठराविक विकास निकष पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येतील.अशी माहिती यावेळी मीना यांनी सांगितली.
यावेळी मीना म्हणाले की गाव मजबूत तरच जिल्हा परिषद मजबूत होईल. समृद्ध पंचायत अभियानाद्वारे गावकुसातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे अभियान ही केवळ योजना नसून ग्रामीण परिवर्तनाची चळवळ ठरेल. असा मुख्यमंत्र्यांनी नारा देत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार असून, गावांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना समृद्ध पंचायत असा दर्जा देण्यात येणार आहे. या अभियानातून ग्रामीण भागात रोजगार, पायाभूत सुविधा आणि सामाजिक समृद्धीचे नवे पर्व सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला पंचायत राज विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ उपस्थित होते.