Wardha accident :- समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) धावत्या कंटेनरला आयशर वाहनाने मागाहून धडक दिली. आशयर चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात (Accident) घडल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी २४ जुलै रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्ग चॅनेज क्रमांक ३६/९०० नागपूर कॉरिडोर परिसरात घडला. यावेळी महामार्ग पोलिस मदत केंद्र जामअंतर्गत उपकेंद्र येळाकेळी कर्मचार्यांनी मदत कार्य केले.
अपघातात दोघे जखमी, झोपेच्या डुलकीने अपघात
नाशिक येथून फुलकोबी घेऊन युपी ७० पीटी १७९१ क्रमांकाचा आशयर घेऊन चालक सिबुलो पाल (वय २२) रा. सय्यासराना, ता. चामल, जि. कोसंबिर हा पटणा येथे चालला होता. दरम्यान, त्याला झोपेची डुलकी आल्याने चालत्या कंटेनर (क्रमांक एम एच ०५ एफ जे ०३८६) ला मागून धडक दिली. महामार्ग पोलिस मदत केंद्र जामचे अधिकारी, कर्मचारी गस्त करत असताना या अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळ गाठले. अपघातामध्ये आयसर चालक सिबुलो पाल हा गंभीर जखमी झाला. वाहक अनिल कुमार मुन्ना लाल पाल (वय २२) रा.जलालपूर हे किरकोळ जखमी झाले. दोघांनाही समृद्धी महामार्ग अॅम्बुलन्सद्वारे सावंगी (मेघे) रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सेलू पोलिसांना माहिती देण्यात आली.
महामार्ग पोलिस मदत केंद्र जाम येथील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांच्यासह कर्मचार्यांनी मदत कार्य केले. आशयर चालक केबिनमध्ये फसला होता. कटर मशीनद्वारे वाहन कटिंग करून जखमीला बाहेर काढण्यात आले. अपघात स्थळावर वाहनांना बाजूला करून सेफ्टी स्टाफच्या मदतीने बॅरिकेटिंग तसेच सेफ्टी कोण लावण्यात आले.




