हिंगोली (Election code of conduct) : विधानसभा निवडणूक निमित्ताने १५ ऑक्टोंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा करून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आदर्श आचार संहिता लागू केली होती. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील आदर्श आचार संहिता तात्काळ प्रभावाने संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोंबर पासून आदर्श आचार संहिता राज्य निवडणूक आयोगाने लागू केली. ही (Election code of conduct) आचार संहिता लागू झाल्यापासून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार करावयाच्या कार्यवाहीसाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर २० नोव्हेंबरला मतदान झाले. २३ नोव्हेंबरला मतमोजणी पूर्ण झाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव अश्वनी कुमार मोहाल यांनी २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक असलेल्या सर्व राज्यांसाठी एक आदेश प्रेषित केला आहे. या (Election code of conduct) आदेशात नमूद आहे की, देशातील महाराष्ट्र व झारखंड येथील विधानसभा निवडणुकांसहीत इतर काही राज्यांत विधानसभा व काही ठिकाणी लोकसभांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर पासूनच देशभरातील आचार संहिता तात्काळ प्रभावाने संपुष्टात आल्याचे कळविले आहे. ही आचार संहिता संपुष्टात आल्याने आता विकास कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.