दारव्हा (Yawatmal) :- तालुक्यात तांदूळ तस्करीचा मोठा रॅकेट बिनदिक्कतपणे सक्रिय असून, प्रशासन डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. बोदेगावच्या नावावर सुरू असलेली ही अवैध तांदूळ वाहतूक उघडपणे सुरू असतानाही प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्याचे सध्या चित्र आहे आठवड्यातून किमान तीन वेळा तांदळाच्या मोठ्या खेपा सीमेलगतच्या राज्यांत पोहोचत असून, या काळ्या धंद्याला पाठबळ कुणाचे? याबाबत विविध चर्चांना पेव फुटले आहे. विशेष म्हणजे, स्थानिकांनी वारंवार माहिती देऊनही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.
बोदेगाव च्या तस्कराला पाठबळ तरी कोणाचे?
अवैध तस्करीतील ट्रक पकडण्यात आला तरी कारवाईचा मात्र बागुलबुवा करण्यात येत आहे. यामुळे हा घोटाळा दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे. या तस्करीच्या प्रकाराने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोदेगाव परिसरातून तांदूळ तस्करी होत असल्याचे वृत्त स्थानिकांनी प्रशासनाला अनेकदा कळवले आहे. मात्र, ठोस कारवाई तर सोडाच, अधिकार्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. उलट, अधिकारी या प्रकरणावर मूग गिळून गप्प बसले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तस्करांनी प्रशासनातील काही व्यक्तींना ‘मॅनेज’ केल्यामुळेच हा बेकायदेशीर व्यवसाय निर्ढावलेपणाने सुरू आहे. यामुळे प्रशासनासह सर्व यंत्रणा गप्प का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर खुलासा केला की, ‘आम्ही तांदूळ (rice) तस्करीबाबत (smuggling) वरिष्ठ अधिकार्यांना अनेकदा माहिती दिली. पण प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून कारवाई टाळली जाते.
सामान्य नागरिकांचा विश्वास उडत चालला आहे
तस्करी करणारा व्यक्ती स्वतःला एका मोठ्या राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगतो. त्यामुळे अधिकारी त्याच्याविरुद्ध बोलायलाही घाबरतात.’ या प्रकारामुळे प्रशासनावर दबाव असल्याचे स्पष्ट होते आणि सामान्य नागरिकांचा विश्वास उडत चालला आहे. या तस्करीचे आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. बोदेगाव हे केवळ नावापुरते पुढे केले जात असून, प्रत्यक्षात तेलगव्हाण येथील गुप्त ठिकाणांवरून तांदळाचे ट्रक भरले जातात. हे ट्रक रात्रीच्या अंधारात सीमेलगतच्या राज्यांमध्ये पाठवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत काही स्थानिक अधिकारी, दलाल आणि राजकीय कार्यकर्ते गुंतले असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही तस्करी किरकोळ स्वरूपाची नसून, यातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. आठवड्यातून सरासरी तीन ट्रक भरले जातात आणि प्रत्येक ट्रकमध्ये लाखो रुपयांचा तांदूळ असतो. या व्यवहारातून मिळणारा मोठा वाटा प्रभावशाली लोकांच्या खिशात जात असल्याची शक्यता आहे.या प्रकारामुळे बोदेगाव परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या तस्करीत बोदेगांवचा पंकज मुख्य सूत्रधार असून प्रशासन खरोखरच बधिर झाले आहे का?
सामान्य माणूस कायद्याचे पालन करत असताना काही तस्कर मोकळ्या रस्त्यावर बेकायदेशीर व्यवसाय करून प्रशासनाला मूर्ख बनवत आहेत. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ‘जर प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा बोदेगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे. हा संताप आता कृतीत बदलण्याची शक्यता आहे. या तस्करीत बोदेगांवचा पंकज मुख्य सूत्रधार असून प्रशासन खरोखरच बधिर झाले आहे का? आणि या साखळीत कोण कोण आहे, याचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर लोकशाहीत नागरिकच अंतिम न्याय करतात, हे विसरून चालणार नाही. आता प्रशासन कधी जागे होणार आणि कारवाई होणार की तस्करीचा हा सुळसुळाट असाच सुरू राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.