Chandrapur :- ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कुडेसावली येथील शेतकरी (Farmer) घनश्याम गोविंदा उंदीरवाडे (५२) हे शेतावर गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने पद्मापुर बिटातील बल्लारपूर चक येथे गट क्र.७३ मध्ये हल्ला करून जागीच ठार केले.
कुटुंबीयांना तात्काळ पंचवीस हजाराची मदत
कुडेसावली येथील शेतकरी घनश्याम उंदीरवाडे हे सकाळी ७ वाजता घरुन शेतावर गेले होते. शेतात काम करीत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने (tiger) सकाळी ११ वाजता सदर शेतकर्यावर हल्ला केला. सायंकाळ होऊनही हा शेतकरी घरी न आल्याने घरच्या व्यक्तीनी शोधाशोध केली असता या शेतकर्याचे बल्लारपूर चक येथील गट क्रं.७३ मध्ये प्रेत आढळून आले. सदर घटनेची माहिती गावात पोहोचताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व मेंडकी पोलिस हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करून मृतदेह (Dead body) उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ पंचवीस हजाराची मदत देण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी ए. व्ही.सोनडवले, एम. व्ही. नागोसे, एस. एम. लोणारे वनक्षेत्र सहायक, वनरक्षक एस.एम.प्रधान, आदे, गायकवाड, बागडे आदी उपस्थित होते.