सुधारित निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न!
रिसोड (Farmer Training) : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र (Agricultural Science Centre) वाशिमच्या वतीने ‘सोयाबीन पीक व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान’ विषयक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे (Training Program) आयोजन दिनांक 18 जून 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्रावर करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने उत्पादन वाढवण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन (Technology Guidance) करण्यात आले.
तेलबिया पिकांमधील उत्पादन वाढीसोबतच बियाणे उत्पादनाचे महत्त्व!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेलगाव राजगुरे येथील सरपंच श्री. पंजाब सोनुने, पोलीस पाटील श्री नारायणराव वाघ, आगरवाडी सरपंच श्री गजानन मुंडे व खडकी सदार येथील सरपंच सौ. गंगाबाई सुरसे उपस्थित होते. डॉ. आर. एल. काळे यांनी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, तेलबिया उत्पादन वाढीसाठी सुधारीत तंत्रज्ञान, दर्जेदार वाण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आवश्यक असून तेलबिया पिकांमधील उत्पादन वाढीसोबतच बियाणे उत्पादनाचे महत्त्व, माती परीक्षण, एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सत्रात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पिकशास्त्र श्री. टी. एस. देशमुख यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक व्यवस्थापनातील महत्वाचे घटक जसे की उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांची निवड, योग्य पेरणी अंतर, जैविक व रासायनिक खते वापरण्याचे प्रमाण व वेळ, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण तंत्र, कीड-रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली.
विषय- विशेषज्ञ कृषी अर्थशास्त्र
डॉ. डी. एन. इंगोले यांनी शेतकऱ्यांना इनपुट-आउटपुट अर्थकारणाचे महत्त्व सांगताना, योग्य नियोजन आणि कृषी निविष्ठांचा (Agricultural Inputs) कार्यक्षम वापर करून उत्पादन खर्च कमी करत उत्पन्नात वाढ कशी साधता येईल यावर भर दिला.
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पीडीकेव्ही अंबा आणि फुले दुर्वा या सुधारित वाणांचे बियाणे वाटप (Distribution of Seeds) करण्यात आले. ही वाणे मध्यम कालावधीची, कमी उंचीची, अधिक फुटवे देणारी व कीड-रोग प्रतिकारशक्ती असलेली आहेत. उत्पादन क्षमता अधिक असून, बाजारभावासाठी उपयुक्त अशा वैशिष्ट्यांमुळे या वाणांचा शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. खडकिसदर, आगरवाडी, मौजा, शेलगाव राजगुरे आणि वाघी या गावांतील अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी वाघ, प्रविण जाधव व अक्षय गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. एस. देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय गिरी यांनी मानले.