यवतमाळ (Yawatmal) :- निसर्गाचा लहरीपणा अन त्याचा बळीराजा वर्गाला बसत असलेला फटका हा आता नित्याचाच विषय झाला आहे. गेल्या चोवीस तासापासून जिल्हाभरात चिरीमिरी पाऊस पडत आहे. मात्र अजूनही शेतकर्यांना (Farmer)दमदार पावसाची अपेक्षा कायमच आहे. शिवाय जवळपास ५० टक्के शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
इ ५० टक्के शेतकर्यांवर ओढवले दुबार पेरणीचे संकट
सध्याघडीला बळीराजा चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत. जून महिना संपत आला तरी दमदार पाऊस अद्यापही आला नसल्याने पावसाची अपेक्षा कायमच आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही पाहिजे तसा पाऊस (Rain)जिल्हाभरात झाला नाही. आभाळ रोज भरून येते, वार्याने गारवा निर्माण होतो, पण प्रत्यक्षात पाऊसच तूरळक आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर काळजीच्या रेषा स्पष्टपणे दिसत आहेत. अनेक शेतकर्यांनी आधीच कोरडवाहू पेरण्या केल्या होत्या, यादरम्यान पाऊस येणार असल्याची शेतकर्यांना आशा होती.मात्र दीड ते दोन आठवड्यांचा कालावधी लोटूनही पाऊस पडला नाही. या काळात एकदोन वेळ अल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यातून थोड्याफार प्रमाणात कोमावर आलेली पिके अपेक्षित पावसाचा खंड पडल्याने उद्ध्वस्त झाली. तर काही भागात उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आता दुबार पेरणीची भीती उफाळून आली आहे. अनेक गावांमध्ये जमिनी कोरड्या पडल्या आहेत. उकाड्याने जनावरांनाही त्रास होतो आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पीक न उगवल्याने दुबार पेरणीसाठी शेतकर्यांनी पुन्हा बियाणे आणायला सुरुवात केली
गेल्या चोवीस तासापासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुरळक (चिरीमिरी )प्रमाणात पाऊस पडला.मात्र शेतपिकांसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याने पुढील काळात पावसाचा पुन्हा खंड पडल्यास उरलेली पिकेसुद्धा उध्वस्त होणार आहे.एकूणच गेल्या चोवीस तासांमध्ये पडलेला चिरीमिरी स्वरूपाचा पाऊसही पिकांसाठी धोकादायक असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. पीक न उगवल्याने दुबार पेरणीसाठी शेतकर्यांनी पुन्हा बियाणे आणायला सुरुवात केली असून आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग पेरण्याचा तयारीत आहे.आतापर्यंत जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवर पेरणी झाली असून अद्यापही शेतकर्यांना दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे.




