शेतकरी विरोधी सरकार विरुध्द बळीराजाची तीव्र नाराजी!
मानोरा (Farmers) : मानोरा तालुक्यात खरीप हंगामात निसर्गाची अवकृपा झाली असून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत (Financial Aid) देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती, मात्र अद्याप नुकसानीच्या याद्यांचेही नियोजन नसल्याने बळीराजांची दिवाळी अंधारात गेली. आता नागदिवाळीलाच मदत मिळणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता शेतकरी विरोधी सरकारच्या विरुद्ध मदतीसाठी पुकारलेल्या प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आणि शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात सततच व अतिवृष्टीचा (Heavy Rain) पाऊस व हुमणी अळी आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावाने सोयाबीन कापूस तूर व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ढग सदृश्य अतिवृष्टीने कहर केल्याने नदी नाल्या काठच्या शेतामधील पिके उध्वस्त झालेली आहेत. अशात शासनाने १८, ५०० रुपये २ हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवत नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे वाजागाजा करून जाहीर केले. परंतु १८५०० पैकी ८५०० रुपये पेक्षा कमी तुटपुंजी अल्प मदत बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. आज उद्या सरकारची मदत खात्यात जमा होईल, या प्रतीक्षेत असलेले शेतकरी दिवाळी होऊन आठवडा झाला तरी त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने सरकार विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
अतिवृष्टीचे संकट डोक्यावर असतानाच आता खरीप हंगामातील पिके काढणीला आली असताना व काही शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाची पेरणी झाली असताना परतीच्या अवकाळी मुसळधार पावसाने बसायला सुरुवात केली आहे. यामुळे नैसर्गिक संकटाच्या सावटात सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी झाडाला पांढरे सोने येचनीला आलेले आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोंगूण ठेवलेले सोयाबीन काढण्यासाठी सुडी मारून ठेवलेले आहे. परंतु अवकाळीचा कहर शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे अशाच शेतकऱ्यांनी करावे तरी काय? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. एकीकडे निसर्ग कोपत आहे तर दुसरीकडे सरकार मदत करायला तयार नाही. त्यामुळे सरकारची मदत मिळेल तरी कधी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारने सातबारा कोरा करावा, तसेच ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीची मदत करावी यासाठी बळीराजा आता प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू व शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांनी शेतकरी विरोधी महायुती सरकार विरुध्द आंदोलनाकडे लक्ष केंद्रीत करून आंदोलनाला जाहीर पाठींबा देत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्ष उलटूनही ते दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच अतिवृष्टीचे तुटपुंजी अनुदान सुध्दा दिवाळी पुर्वी खात्यात जमा केले नाही. संत्रा, भाजीपाला व फळबाग शेतकरी सुध्दा मदतीपासून वंचितच आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर शेतकरी विरोधी फसव्या महायुतीला धडा शिकविणार असे मत संत्रा उत्पादक शेतकरी विशाल ठाकरे यांनी व्यक्त केले.
दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारने सातबारा कोरा करावा, तसेच ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीची मदत करावी यासाठी बळीराजा आता प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू व शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांनी शेतकरी विरोधी महायुती सरकार विरुध्द आंदोलनाकडे लक्ष केंद्रीत करून आंदोलनाला जाहीर पाठींबा देत आहे.




