कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द
काजू - बदाम घेऊन वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड, अखेर तहसीलदारांना करावी लागली पाहणी
मानोरा (Manora Taluka Pik Inspection) : मानोरा तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून करण्यासाठी कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचा शासकीय दौरा दि. १९ सप्टेंबर रोजी कुपटा सर्कलमध्ये होणार होता, मात्र पालकमंत्र्यांनी ऐनवेळी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मानोरा तालुक्यात (Manora Taluka Pik Inspection) गेल्या दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर हे पीक पूर्णपणे करपले आहे. या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शासकीय नियोजीत दौरा होता, ते सायंकाळी ३.४५ च्या सुमारास येणार होते. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच त्यांच्या स्वागतासाठी आणि आपल्या व्यथा मांडण्यासाठी सरकळमधील कुपटा येथे जमले होते.
दुष्काळात होरपळत असलेल्या काही शेतकऱ्यांनी तर आपल्या लाडक्या पालकमंत्र्यासाठी प्रेमापोटी काजू-बदाम शहरातून आणून कुपटा येथे पालकमंत्री येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, रात्रीला उशीर झाल्याच्या कारणावरून कारंजा लाड २० किलोमीटर अंतरावरूनच अकोलाकडे पालकमंत्री महोदय ताफ्यासह निघून गेल्याने शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला.
पालकमंत्री न आल्याने अखेर त्यांच्या येण्याच्या प्रतीक्षेत असलेले तहसीलदार राजेंद्र पाटील यांनाच पिक नुकसानीची पाहणी करावी लागली. त्यांनी कुपटा सर्कलमधील करपलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आश्वासन देऊनही पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता निघून जाणे हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनाने केवळ पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच मागील व यावर्षीचा पिक विम्यासह तात्काळ दुष्काळी सवलत लागू करण्याची मागणीही बळीराजामधून होत आहे.