हिंगोली (Online gambling case) : शहरातील फुलारी मंडईच्या मागे सुरु असलेल्या ऑनलाईन जुगारावर हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून एका आरोपीवर (Online gambling case) गुन्हा दाखल केला.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अवैध धंद्याविरुध्द आक्रमक धोरण स्विकारून जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे चालता कामा नये असा इशाराही जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांना दिला आहे. हिंगोली शहरातील फुलारी मंडईच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये ऑनलाईन जुगार सुरु असल्याची माहिती २२ ऑगस्टला हिंगोली शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक संदिप मोदे यांच्यासह अशोक धामणे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे, गणेश वाबळे, संतोष करे, गणेश लेकुळे यांच्या पथकाने रात्री छापा मारला. सदर ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करून ऑनलाईन मटका जुगार चालवून लोकांकडून पैसे घेतले जात होते.
ज्यामध्ये शासनाने अधिकृत न केलेल्या (Online gambling case) ऑनलाईन जुगाराच्या चिठ्ठ्या खेळणार्यांना दिल्या जात होत्या. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी ६ हजार रुपयाची मशीन, ३ हजाराचे ऑनलाईन चिठ्ठ्या यासह इतर साहित्य व नगदी रक्कम १७ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात अशोक धामणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अचल लक्ष्मीनारायण चौधरी रा. मारवाडी गल्ली हिंगोली याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून नोटीस देवून सोडले. पुढील तपास कोरडे हे करीत आहेत.