बारव्हा (Bhandara) :- अहो साहेब ! गेल्या दीड महिन्यापासून आमच्या गावासभोवताल पट्टेदार वाघ फिरतोय, त्याला पकडून बंदोबस्त करा साहेब !! आमचा जीव वाचवा म्हणून वनविभागाकडे टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे वनविभागाने (Forest Department) दुर्लक्ष केल्याने अखेर पट्टेदार वाघाने युवा शेतकऱ्याची शिकार केली आहे. सदर घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी पट येथील असून डाकराम देशमुख वय 38 वर्ष असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू (Death) पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गावासभोवताल पट्टेदार वाघ फिरतोय..!
डाकराम देशमुख हा शेतकरी उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी खैरी पट स्मशानभूमीजवळील शेतात गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी पाच वाजता सायकलने शेतावर गेला होता. या दरम्यान गेल्या एक ते दीड महिन्यापासून चूलबंद नदी खोऱ्यात वास्तव्यास असलेल्या एका पट्टेदार वाघाने (Tiger) डाकराम देशमुखवर हल्ला करून शिकार (hunting) केली. रात्री उशिरापर्यंत डाकराम देशमुख घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र थांगपत्ता लागला नाही. रात्री उशिरा लाखांदूर वन विभाग व पोलिस कर्मचाऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र निराशाच पदरी पडली. आज सोमवार दि . 31मार्च रोजी सकाळपासूनच वन विभाग व लाखांदूर पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास मोहीम सुरू केल्याने अखेर डॉकराम देशमुख याचा मृतदेह (dead body) त्याच्याच शेताच्या बाजूला असलेल्या मका पिकाच्या शेतात सकाळी सहा वाजताच्या दरम्यान मिळाला आहे.
रात्री बेरात्री शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागते
सदर मृतदेह मिळाल्याची माहिती कुटुंबीयांना न देताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेह लाखांदूर येथील शव विच्छेदन गृहात आणल्याने खैरी पट येथील नागरिक व कुटुंबीय रोष व्यक्त करीत असून गावातील वातावरण तापले आहे.खैरी पट येथील गावातील शेकडो लोकं लाखांदूर येथे पोहचत असून रोष व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पट्टेदार वाघ लाखांदूर तालुक्यात भ्रमंती करीत आहे. या परिसरात उन्हाळी धान पिकाची लागवड केली असल्याने विदयुत च्या वेळेनुसार सकाळी दुपारी व कधी रात्री बेरात्री शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागते. हे येथे उल्लेखनीय आहे.