Gadchiroli :- आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना आज उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात जिल्हाधिकारी पंडा यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड
जिल्ह्यातील परीस्थितीवर मात करण्यासाठी ‘आदी कर्मयोगी अभियान – प्रतिसाद देणारा प्रशासन कार्यक्रम’ राबवण्यात आला. या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली गेली. जिल्ह्यामध्ये ५५३ आदी सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली. तसेच, सुमारे ५३ हजार नागरिकांचे प्रभावी एकत्रीकरण केले. ५५३ ग्रामसभांचे आयोजन करून प्रत्येक गावाचा ग्राम कृती आराखडा तयार करण्यात आला.सामुदायिक वन हक्क कायद्यांतर्गत ग्रामसभांना ५.१२ लाख हेक्टरहून अधिक वनजमीन व्यवस्थापनासाठी सुपूर्द करण्यात आली. तसेच, ४९७ ग्रामसभांची मनरेगा अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १७ विविध विभागांशी प्रभावी समन्वय आणि एकत्रिकरण केले.
या लोककल्याणकारी व परिणामकारक प्रशासकीय मॉडेलमुळे गडचिरोली जिल्ह्यास पुरस्कृत करण्यात आले. राज्यातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची यासाठी निवड झाली हे विशेष.