Gadchiroli Crime :- गडचिरोली जिल्ह्रात वाढत्या चोरीच्या व घरफोडीच्या गुन्ह्रांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे, पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने दि. २६ जून रोजी गडचिरोली शहरात मागील आठवडयामध्ये चामोर्शी रोड, धानोरा रोड, चंद्रपूर रोडवरील व्यापारी दुकानांचे शटर लॉक (Shutter Lock) तोडून चोरी करणारी टोळी उघडकीस आणण्याची कारवाई गडचिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. आरोपीमध्ये ४ अल्पवयीन बालकांचा समावेश आहे.
आरोपीमध्ये ४ अल्पवयीन बालकांचा समावेश
गडचिरोली पोलीस ठाण्यात १९ जून २०२५ रोजी अप क्रमांक ४२६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. पोलीस ठाण्यातील डिटेक्शन स्टाफचे अधिकारी व अंमलदार यांनी शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras)चेक करून, रात्रगस्त वाढवून सदर टोळीतील आरोपींचा शोध घेतला. गडचिरोली पोलीसांनी ०४ अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे. सदर अल्पवयीन बालकांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अल्पवयीन आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता बाल न्यायमंडळ गडचिरोली यांचे समोर हजर केले जाणार आहे. ही कारवाई गडचिरोली पोलीस ठाण्याचे बाल कल्याण पोलीस अधिकारी यांच्यामार्फतीने होणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप खोब्रागडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, डिटेक्शन पथकातील पोलीस अंमलदार धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्राागडे, अतुल भैसारे यांनी पार पाडली.