हिंगोली (Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना आता कात्री लावताना ई-केवायसी’ (E KYC) करण्याची अट शासनाने टाकली आहे. मात्र अधिकृत संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचण येत आहे. कनेक्टिव्ही, लिंक ओपन न होणे आदी अडचणी गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. या अडचणींमुळे बहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) पारदर्शकपणे राबविण्यासाठी ई-केवायसी (E KYC) एक करणे बंधनकारक केले आहे. या ई-केवायसीमुळे पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल आणि गैरप्रकार थांबतील, परंतु लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ ठप्प झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण केवायसी करताना एरर येत आहे. तर काही महिलांना ओटीपी येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी अनेकांनी उपाययोजनांची मागणी केली आहे.
सरकारने ई-केवायसीसाठी (E KYC) दोन महिन्यांचा ठरावीक कालावधी दिला आहे. कागदपत्रे सादर करूनही केवळ तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र (Ladki Bahin Yojana) महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या त्रासातून मुक्तता मिळावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे. लाभापासून कुणीही गोरगरीब आणि गरजू पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी. शासन व संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन ई केवायसीची वेबसाईट सुरळीत करण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
ई केवायसीसाठी (E KYC) येणाऱ्या अडचणी मध्ये लिंक ओपन न होणे, अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर येणे, ओटीपी न मिळणे या तांत्रिक अडचणींनी बहिणींना मनस्ताप होत आहे. शहरी भागातही ही समस्या गंभीर असून, ग्रामीण भागात परिस्थिती आणखीनच बिकट आहे. केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहेत. परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना पती हयात नाहीत किंवा वडील देखील नाहीत. त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की, केवायसी करताना आधार क्रमांक कुणाचा टाकायचा. त्यांच्यासाठी सरकारने तत्काळ वेगळा तोडगा काढणे गरजेचे आहे.