गोंदिया (Gondia Assembly Election) : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जसजसा समोर जात आहे. तसतसा नव-नवे समीकरण पुढे येत आहेत. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील उलटफेरानंतर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात नविन ट्विस्ट समोर आला आहे. महायुतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वाट्याला सोडले. परंतु, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराला डावलून भाजपच्या जुन्या चेहर्याला जवळ राष्ट्रवादी काँग्रेसने नवा खेळ खेळला आला आहे. भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राकाँ (अप) गटात प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी निश्चिती मानली जात आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा (Assembly Election) क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यातल्यात्यात आगामी निवडणुकीला समोर जाताना महायुती धर्मातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार, असे मानले जात आहे. त्यानुरूप भाजपने काही दिवसांपूर्वीच जाहिर केलेल्या पहिल्या यादीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र वगळला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार, हे निश्चित झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे किंवा त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांची सुरू असलेली जय्यत तयारी पाहून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडूनही मिळालेल्या सुचनांनुसार चंद्रिकापुरे कामाला लागले होते. तर दुसरीकडे महायुती धर्मातून ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली तरी भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी देखील दंड थोपटले होते. ही जागा राष्ट्रवादीने लढविली तरी माजी मंत्री राजकुमार बडोले हे अपक्ष निवडणूक लढविणार, असेही बोलले जात होते. सर्वच पक्षांकडून उमेदवार्यांच्या चाचपण्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत.
उमेदवारांच्या यादी जाहिर होवू लागल्या आहेत. अशात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात (Assembly Election) नविन ट्विस्ट आले आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या सर्वच पक्षापैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ने जाळ टाकून त्यांना अडविण्यात यश मिळविले. त्यामुळे महायुतीने संगनमतातून म्हणजेच भाजप पक्षश्रेष्ठींच्या समंतीतून जुन्या चेहर्यावर नवा खेळ खेळण्याचा मनसुबा जाहिर केला आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी काल (ता.२१) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या अधिकृत प्रवेशामुळे अर्जुनी मोरगावात राकाँकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या उमेदवारीला पक्षाकडून नाकारण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आ. चंद्रिकापुरे यांच्या भुमिकेकडे लक्ष
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी (अजित पवार) कडून निवडणूक लढविणार, अशा हालचाली होत्या. त्याच बरोबर आ.चंद्रिकापुरे ऐवजी त्यांचा मुलगा डॉ.सुगत चंद्रिकापुरे त्यांनाही उमेदवारी दिली जावू शकते, अशीही चर्चा सुरू होती. त्यातच भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मनोहर चंद्रिकापुरे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. अशात आ.मनोहर चंद्रिकापुरे, डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांची भुमिका राहणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस कुणावर डाव खेळणार?
महायुतीकडून उमेदवारी दिल्यास माजी मंत्री राजकुमार बडोले हे बंडखोरी करतील, असा अंदाज वर्तविला जात होता. त्या अनुसंगाने वेट अॅण्ड वॉचच्या भुमिकेत असलेल्या महाविकास आघाडीने अद्यापही आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. अलीकडे ‘तुतारी कि पंजा’ असा पेच निर्माण केला जात होता. मात्र राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे ही जागा काँग्रेसच लढविणार, हे निश्चीत झाले आहे. त्यातच काँग्रेसमध्ये इच्छूकांची गर्दी आहे. क्षेत्र व क्षेत्राबाहेरील असा वाद निर्माण झाल्याने उमेदवाराच्या निवडीला घेवून विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस कुणावर डाव खेळणार? याकडे लक्ष लागले आहे.
समर्थकांत नाराजीचा सुर
माजी मंत्री बडोले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या पाठिशी उभे असलेले समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे सुर दिसून येत आहेत. असे असले तरी शेवटी ते महायुतीचे उमेदवार राहणार असल्याचे ही नाराजी किती काळ टिकणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.




