पालकमंत्री आ. संजय बनसोडे यांची उपस्थिती
परभणी (Sanjay Bansode) : जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार ३ ऑगस्ट रोजी होणार असून पालकमंत्री आ. संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन होणार आहे. विरोधातील खासदार, आमदार यांना विश्वासात न घेतल्यास परत या नियोजनावरही विघ्न येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील तत्कालीन पालकमंत्री सावंत यांनी जिल्ह्याचे नियोजन करताना मोठ्या प्रमाणावर टक्केवारी घेवून मनमानी केल्याचा आरोप खा. संजय जाधव यांनी केला. त्यानंतर काही जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी नियोजनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे झालेल्या नियोजनातील कामांना थांबा मिळाला. अनेक विकासकामे रखडली.
हे प्रकरण न्याय प्रविष्ठ राहिले. त्यानंतर पालकमंत्री बदलण्यात आला. आ. संजय बनसोडे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले. पालकमंत्री बनसोडे (Sanjay Bansode) यांनी जिल्ह्याचे नियोजन करण्या संदर्भात ३ ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे. ३४५ कोटींचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे. या बैठकीला खा. संजय जाधव, आ. डॉ. राहूल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, आ. मेघनाताई बोर्डीकर, नुतन आ. राजेश विटेकर, आ. रत्नाकर गुट्टे व इतर नियोजन सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व प्रशासकीय प्रमुख यांची हजेरी राहिल. हे नियोजन व्यवस्थित न केल्यास या नियोजनामध्येही अडचण निर्माण करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.




