जुन्या इमारतीत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर बंद?
परभणी (Health Center) : परभणीच्या ताडकळस येथील पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत कार्यालय (Gram Panchayat Office) असलेल्या ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गत काही दिवसांपासून रिक्त पदांचा आजार झाला असून येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी पद गत तीन ते चार वर्षांपासून रिक्त असुन या गंभीर प्रकारामुळे कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच (Employees) नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी येण्या-जाण्या साठी मजबूत रस्त्यासह मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. जुन्या इमारतीत गत दोन ते तीन वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर देखील बंद असल्याने या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची प्रतिक्षा रुग्णांना होत असुन या नवीन इमारतीत रुग्णांना (Patients) सेवा कधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
मजबूत रस्त्यासह मुलभूत सुविधा कधी मिळणार?
या बाबत सविस्तर माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत कार्यालयासह लोकसंख्या असलेल्या ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत फुलकळस, लिमला, निळा, खुजडा, बलसा बु हे पाच उपकेंद्र असुन 25 गावांचा समावेश आहे. येथील दोन्ह पण वैद्यकीय अधिकारी पद (Post of Medical Officer) रिक्त आहेत. तसेच विविध पदे रिक्त असल्याने कार्यरत कंत्राटी व प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ताडकळस येथे 50 गावांचे पोलीस ठाणे असल्याने या ठिकाणी नेहमीच छोटे- मोठे भांडण तंटे होऊन जखमी झालेल्यांची संख्या मोठी आहे. तसेच या ठिकाणी या परिसरातील 30 ते 40 गावांची बाजारपेठ आहे. तसेच विविध शासकीय व निम शासकीय संस्था असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत नसलेल्या गावातील अनेक रुग्ण देखील याच ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी येत असल्याने दररोज 150 ते 200 बाह्य रुग्णांची संख्या आहे.
नवीन इमारतीत रुग्णांना सेवा द्यावी मागणी!
या सर्व प्रकारच्या अडचणी लक्षात घेऊन गेले 10 ते 12 वर्षांपासून ताडकळस येथे ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी स्थानिक राजकीय पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी मागणी केली आहे. परंतु या मागणीला प्रशासनासह (Administration) शासनाने केराची टोपली दाखवली असुन, या ठिकाणी नविन इमारत बांधकामासाठी निधीवरच बोळवण केली आहे. या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही इमारत गावापासून 1 किमी अंतरावर गायरान जमिनीवर झाले आहे. परंतु रुग्णांना येण्या-जाण्या साठी मजबूत रस्ताच नाही. यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ मजबूत रस्त्यासह मुलभूत सुविधा उपलब्ध करून लवकरात-लवकर या नवीन इमारतीत रुग्णांना सेवा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तालुका आरोग्य अधिकार्यांच्या खांद्यावर!
ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदे आहेत. परंतु काही वर्षापासून ही दोन्ही पदे रिक्त असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा (Primary Health Centre) कारभार सध्या दोन कंत्राटी डॉक्टरांकडून (Contract Doctor) चालविण्यात येत आहे. तसेच ताडकळस येथील वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पूर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ, व्ही. आर. पाटील यांच्याकडे देण्यात आला असून, या ठिकाणी रिक्त पदांची पुर्तता तात्काळ करावी अशी मागणी रुग्णांतुन होत आहे.