काय डोंगर, काय झाडं, काय पाणीच पाणी काय ओला दुष्काळ!
शेती बांधावर जाण्यासाठी महायुतीच्या पालकमंत्र्यांना विसर!
मानोरा (Heavy Rain) : मागील ऑगस्ट महिन्यात झालेल्या प्रलयंकारी पावसाने मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूचे पूर आणले आहेत. होता तोंडाशी आलेली खरिपाची पिके डोळ्या देखत वाहून गेल्याने आणि गुंतविलेला पैसा मातीमोल झाल्याने, ‘पूर तर ओसरला, पण आता जगायचे कसे?’ हा काळजाला हात घालणारा प्रश्न येथील बळीराजा विचारत आहे. काही भागात पंचनामे पूर्ण झाले असले, तरी शासनाच्या मदतीची केवळ प्रतीक्षाच शेतकऱ्यांच्या नशिबी आली आहे.
मानोरा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या (Heavy Rain) ढगफुटीसदृश पावसाने होत्याचे नव्हते केले. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद आणि फळबाग , भाजीपाला यासारखी उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज काढून केलेला लागवड खर्चही वाया गेल्याने शेतकरी हवालदील झालेला आहे. एकीकडे शासनाच्या मदतीकडे डोळे लागले असताना, दुसरीकडे पीकविम्याच्या बदललेल्या नियमामुळे शेतकरी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. नव्या निकषांनुसार विम्याची रक्कम मिळेल की नाही, याबाबत मोठी साशंकता आहे.
त्यातच, पुढील महिन्यात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. खरिपातील नुकसान रब्बीत भरून काढायचे म्हटले, तरी पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न आहे. त्यामुळे रब्बी पेरणीपूर्वी शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करून बळीराजाला आधार द्यावा, अशी एकमुखी मानोरा तालुक्यातील कष्टकरी, कामगार शेतमजूर यांनी शासन व प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधी यांना केली आहे.
अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला असुन तालुक्यातील शेतकऱ्यांनी बॅंक, आणि खाजगी सावकाराकडून कर्ज काढून केलेली लागवड खर्चही वाया गेल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य, लग्न तोंडावर आलेले सण आणि रोजचा घरखर्च कसा भागवायचा, या विवंचनेत तो अडकलेला आहे. या (Heavy Rain) अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फेरले गेले आहे. प्रशासनाने काही भागात नुकसानीचे पंचनामे केले असले तरी मदतीची रक्कम किती आणि केव्हा मिळणार, याबाबत कोणतीही ठोस घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बुडत्याला काडीचा आधार अशी झाली आहे.
महायुतीच्या पालकमंत्र्यांचा नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी पत्ताच नाही. वाशिम जिल्ह्यासह कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघातील मानोरा तालुक्यात ढगफुटीसदृष्य पावसामुळे ७७ गावातील पिकांचे, घरांचे प्रचंड नुकसान झालेत. ३० ऑगस्टच्या मध्यरात्री दरम्यान आलेल्या मुसळधार पावसाने चोहीकडे कहर केला. नदीनाल्यांना पुर आल्याने नदीकाठची गावे, शेती बहुतांश पाण्याखाली गेली. अनेक घरांची पडझड झाली असून हजारों हेक्टर वरील पिके जलमय झाली अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने शेती पाण्याखालीच आहे. तालुक्यात शेतीच्या बांधावर आणि घरांच्या पडझडीवर जाण्यासाठी महायुतीच्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री यांना साधा वेळ सुद्धा मिळत नसल्यामुळे जणू काही जिल्हाचा पालकमंत्री आता हरपल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.
नाही विमा नाही पंचनामा केवळ लोकप्रतिनिधींची पोकळ आश्वासने! तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाच्या मदतीकडे डोळे लागलेले असताना दुसरीकडे पिकविम्याच्या बदललेल्या नियमांमुळे शेतकरी पुर्णपणे अनभिज्ञ झाला आहे. नव्या निकषाप्रमाणे विमा रक्कम मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. रब्बी हंगामाच्या सुरवातीला व खरीपातील नुकसान रब्बी काढायचे म्हटले की पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न त्यावेळेस उभा ठाकला होता, त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील पेरणीपूर्वी शासनाने भरीव आर्थिक मदत जाहीर व मागील पिक विमा रक्कम देऊन जाणत्या बळीराजाला आधार द्यावा अशी मागणी शेतकरी बांधव मधून होत आहे.




