पत्रकार परिषदेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती!
परभणी (Heavy Rain) : अतिवृष्टी, पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. शेतकर्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासात पहिले सर्वात मोठे पॅकेज जाहीर झाले आहे. दिवाळीपूर्वी डिबीटी प्रणालीव्दारे शेतकर्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम जमा होण्याची कारवाई सुरु होईल, अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बुधवार ८ ऑक्टोबर रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
दिवाळीपूर्वी खात्यावर जमा होईल रक्कम!
यावेळी भाजपा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटींग, प्रेरणाताई वरपुडकर, मंगल मुदगलकर, बाळासाहेब जाधव, विलास बाबर, सचिन अंबिलवादे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती पिकाबरोबर मोठे भौतिक नुकसान झाले आहे. नुकसानीच्या भरपाईसाठी १२८ कोटी रुपये आले आहेत. आणखी ३०२ कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी लागणार आहेत. शेतकर्यांना (Farmers) नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी निकष बाजुला ठेऊन मदत केली जाणार आहे. अतिवृष्टी, पुरामुळे विहिरींमध्ये गाळ साचला आहे. सदरचा गाळ काढण्यासाठी ३० हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. अतिवृष्टीत पिकाबरोबर घर, दुकान, पशुहानी देखील झाली आहे. त्यांनाही मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे. पीक विम्याची जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री लक्ष देत आहेत. राज्यात दुष्काळी सवलती लागु करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील भौतिक नुकसानीसाठी १० हजार कोटीचा निधीही ठेवण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात सर्वच ५२ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत दिली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.