चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचे दागिणे पळविले; गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Burglary) : शहराजवळील गंगा नगर भागातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या घराचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिणे चोरून नेल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक तुकाराम दावडा जाधव यांचे निवासस्थान हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील गंगानगर भागामध्ये आहे. ते नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे नातेवाईकाकडे गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहूण चोरट्यांनी १५ ते २४ एप्रिल दरम्यान त्यांच्या राहत्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून १४ हजार रुपयाचे १० ग्रॅमचे सोन्याचे गहू मणी, १२ हजार रुपयाची १० ग्रॅमची सोन्याची एकदानी, ७५ हजार रुपयाच्या सोन्याच्या ६ अंगठ्या, १८ हजार रुपयाचे प्रत्येकी १ ग्रॅम वजनाचे १० वेड, १ हजार रुपयाचे २ चांदीचे शिक्के व रोख रक्कम असा एकुण १ लाख २० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.
तुकाराम जाधव हे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. २४ एप्रिलला त्यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे ह्या करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीतकर, रमेश जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देेऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र श्वान पथक घटनास्थळीच घुटमळले. तर ठसे तज्ञांनी घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.चक्क सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या घरी चोरी करून चोरट्यांने पोलिसांना आवाहन दिले आहे.