हिंगोली (Hingoli credit institution) : मागील १७ महिन्यांमध्ये हिंगोली शहरातील चार सहकारी पतसंस्था बुडीत निघाल्या. या चारही पतसंस्थांचे बहुतांश अध्यक्ष संचालक व कर्मचार्यांना अटक झाली आहे. पोलीस व सहकार विभाग आपापल्या पद्धतीने आपले काम करीत आहेत; परंतु जवळपास ५० हजार ठेवीदारांच्या हाती आज घडीला एक रुपयाही लागलेला नाही.
पतसंस्थेतील गैर प्रकारांच्या या शृंखलेची सुरूवात कुलस्वामिनी (Hingoli credit institution) महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून झाली. यामध्ये एकुण १६ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल आहे. पतसंस्थेच्या ४ हजार ८१० ठेविदारांचे १० कोटी ६८ लाख ४१ हजार ४३३ रूपये थकले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन १ वर्ष ११ महिने झाले आहेत. दुसर्या क्रमांकावर अनुराधा नागरी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेच्या ११ संचालक व कर्मचार्यां विरूध्द गुन्हा दाखल आहे.
यातील ४ हजार ३८ ठेविदारांचे ५ कोटी ५ लाख ७७ हजार ९१९ रुपयांच्या ठेवि थकीत आहेत. हा गुन्हा सुध्दा १७ महिन्यांपूर्वी दाखल झाला होता. तिसर्या व चौथ्या क्रमांकावर न्यू हिंगोली अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटी व हिंगोली महिला अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी ह्या पतसंस्था आहेत. न्यू हिंगोली पतसंस्थेच्या २५ संचालकां विरूध्द तर महिला अर्बनच्या १९ संचालक व कर्मचार्यां विरूध्द गुन्हा दाखल आहे. या पैकी न्यू हिंगोली अर्बनच्या २ हजार ५२५ ठेविदारांचे ७८ कोटी ४९ लाख ८८६ रुपयांच्या ठेवी थकल्या आहेत. तर हिंगोली महिला अर्बनच्या ठेविदारांचे ३५ कोटी २२ लाख ८८ हजार ३३३ रुपये थकीत आहेत. या दोन्ही पथसंस्थे विरूध्द गुन्हा दाखल होऊन १४ महिने झाले आहेत.
या आकड्यांची गोळा बेरीज केली असता दिसून येते की (Hingoli credit institution) चार पतसंस्थांच्या एकूण ७१ संचालक व कर्मचार्यांविरुद्ध पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला आहे. एकूण ४९१२६ ठेवीदारांचे १२९ कोटी ४६ लाख ८ हजार ५७१ रुपये थकले आहेत. काही पतसंस्थेच्या मुख्य पदाधिकार्यांच्या नावाने काहीच जंगम किंवा स्थावर मालमत्ता नसल्याचे तपास यंत्रणेला कळाले आहे. माजी कर्मचारी व संचालकांच्या मालकीची काही मालमत्ता आहे पण ती विकून ठेवीदारांना रक्कम देणे फारसे सोपे नाही. अशात या ठेवीदारांची मानसिकता आता अधिक बिघडत आहे.
विशेष म्हणजे ठेविदारांनी एकाच वेळी रक्कम परत करण्याची मागणी करू नये, थोडे सबुरीने घेतल्यास कर्ज वसुली करून रक्कम परत करू, अशी विनंती बुडालेल्या चारही पतसंस्थेच्या पदाधिकार्यांनी ठेवीदारांना केली होती. त्यांच्या या विनंतीला प्रतिसाद दिला असता तर फुल ना फुलाची पाकळी परत मिळाली असती असा पश्चातापही आता अनेक ठेवीदार करीत आहेत.
ठेविदारांना न्याय मिळेल – सह. दुय्यम निबंधक माधव यादव
सहकार विभाग व पोलिस यंत्रणेकडून सुरू असलेल्या कारवाई बाबत विचारले असता सह दुय्यम निबंधक माधव यादव यांनी सांगितले की, संचालक व कर्मचार्यांची जी मालमत्ता निष्पन्न झाली आहे त्यावर बोजा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू आहे. न्यू हिंगोली अर्बन व हिंगोली महिला अर्बनच्या ४९ आरोपींची मालमत्ता निष्पन्न झाली असल्याचे ते म्हणाले. यासोबतच कर्जदारांकडून सक्तीने कर्ज वसुलीची प्रक्रीया लवकच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायदीय प्रक्रीयेला वेळ लागत असला तरी पिडीतांना न्याय मिळेल, असा दिलासा सहाय्यक दुय्यम निबंधक माधव यादव यांनी देशोन्नतीशी बोलताना दिला आहे.