स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli Crime) : जिल्ह्यासह परजिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून त्याची विक्री करणार्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून १३ मोटार सायकल जप्त केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्याने पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी विशेष मोहिम राबवून हे गुन्हे उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिल्या होत्या.
त्यानुसार दोन वेगवेगळे पथक नियुक्त केले होते. ज्यामध्ये २७ जुलैला पोलिस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे हिंगोली, परभणी, यवतमाळ व पुणे जिल्ह्यातून मोटार सायकल चोरणारे चोरटे पुन्हा हिंगोली जिल्ह्यात आली असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने हिंगोलीतील रेल्वे स्टेशन परिसरात आकाश गजानन उचितकर, नरेश गजानन रसाळ (हॉटेल चालक) रा.माळहिवरा जि.हिंगोली, आदर्श जीवन कांबळे रा.तोंडगाव जि.वाशिम या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हिंगोलीतील हॉटेल गुलजार समोरून, यवतमाळ जिल्ह्यातील मारवाडी गावातून व पुणे जिल्ह्यातील हद्दीतील भोसली पोलिस ठाणे हद्दीतून तीन मोटारसायकल चोरल्याची कबुली देऊन त्या पोलिसांना काढून दिल्या.
हिंगोली, पुणे व परभणी जिल्ह्यातील ९ गुन्हे उघड
दुसर्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे लक्ष्मण पांडूरंग ढोबळे रा.गुंडा जि.हिंगोली ह.मु. एमआयडीसी परभणी याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता परभणी शहरातील नवमोंढा पोलिस ठाणे हद्दीतील दहा मोटारसायकल चोरल्याची कबुली देऊन त्या मोटार सायकल पोलिसांना काढून दिल्या. या चार चोरट्यांकडून १३ मोटारसायकल असा एकूण ८ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ज्यामध्ये हिंगोली शहर १, खंडाळा पोलिस ठाणे जि.यवतमाळ १, भोसरी पुणे १, नवामोंढा परभणी पोलिस ठाणे ६ अशा ९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. हे चोरटे सराईत असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
८ लाखाच्या १३ मोटार सायकल जप्त
ही कारवाई पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे, पांडूरंग राठोड, गजानन पोकळे, विक्की कुंदनानी, नितीन गोरे, निरंजन नलवार, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, आकाश टापरे, हरीभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली आहे.