मानोरा (Manora) :- तालुक्यातील भुली – हातोली पुलाचे बांधकाम व बंद केलेले नाला सरळीकरचे काम मागील दोन वर्षापासून रखडले आहे. सदरील काम एका शेतकऱ्याने अडविले आहे. त्यामुळे त्वरित कामाला सुरु करण्याबाबत वारंवार संबंधित विभागाला कळवून देखील सुरू करण्यात न आल्यामुळे न्यायासाठी तहसील कचेरीवर दि. १३ जूनपासून माजी प स सदस्य अशोक चव्हाण यांच्यासह शेतकरी (Farmer) व नागरिकांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांनी १ कोटी ५० लाख रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला
दिलेल्या निवेदनानुसार भुली ते हातोली रस्त्यावरील पुल बांधण्यासाठी दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांनी १ कोटी ५० लाख रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला आहे . या कामाची वर्क ऑर्डर होऊन २ वर्ष उलटली आहे. तरी पण अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. नाला सरळीकरणाचे काम रखडल्यामुळे पावसाळ्यात ५०० एकर शेती खरडून जाण्याची शक्यता आहे. शेतकरी राजेंद्र रामकृष्ण चव्हाण यांनी पुलाचे काम अडविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला (Public Works Department) तात्काळ कामे मार्गी लावणे संदर्भात कळवून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे न्यायासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाला शेतकरी अशोक चव्हाण, जय चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी प्रारंभ केला असून उपोषणाला ठाकूरसिंग चव्हाण, डॉ सचिन राठोड, फकीर बाबा आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.




